नवी दिल्ली,
A break for India's tour of Bangladesh? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी मालिकेची घोषणा केल्यानंतर बुधवारी बीसीसीआयनेही त्याला अधिकृत दुजोरा दिला. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान या मालिकेचा यजमान संघ असला तरी तिन्ही सामने भारतातच खेळवले जाणार आहेत.या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. भारतात अलिकडच्या काळात अफगाणिस्तानने आपल्या काही घरच्या मालिकांचे आयोजन केले आहे. आगामी टी-२० मालिकाही अफगाणिस्तानच्या भविष्यातील दौरा कार्यक्रमाचा भाग आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरला दुसरा, तर १७ सप्टेंबरला मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाईल. तिन्ही सामन्यांसाठी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची निवड करण्यात आली आहे.या मालिकेची घोषणा झाल्याने भारताच्या प्रस्तावित बांगलादेश दौऱ्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भारताचा बांगलादेश दौरा आधीपासूनच अनिश्चिततेच्या छायेत होता. आता सप्टेंबरमध्ये भारत-अफगाणिस्तान मालिकेचे निश्चित वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे बांगलादेश दौऱ्याची शक्यता आणखी कमी झाल्याचे मानले जात आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास यांनी अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा देण्याची मंडळाची भूमिका स्पष्ट केली. अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि तेथील खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे हे बीसीसीआयच्या प्राधान्यांपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नियमितपणे होणाऱ्या सामन्यांमुळे दोन्ही संघांना मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळण्याचा आणि महत्त्वाचा अनुभव मिळण्याची संधी मिळते, असे मनहास यांनी नमूद केले. या मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे भारतात स्वागत करताना बीसीसीआय त्यांच्यासोबत मालिका यशस्वी करण्यासाठी काम करण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आता या मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आगामी क्रिकेट वेळापत्रकातील पुढील घडामोडींकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.