आधुनिक वाहतुकीचा नवा अध्याय

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
विशेष...
प्रा. सुखदेव बखळे
a new chapter in modern transportation पुणे हे शहर गेल्या दोन दशकांमध्ये ज्या वेगाने विस्तारले, त्या वेगाने त्याची वाहतूक व्यवस्था विकसित होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. एके काळी सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आज वाहनांची संख्या कोट्यवधींच्या घरात पोहोचली आहे. हिंजवडी, बाणेर, वाकड, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर हा परिसर माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक बनला; मात्र या विकासाची किंमत वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि नागरिकांच्या वेळेच्या अपव्ययाच्या रूपाने मोजावी लागली. अशा परिस्थितीत पुणे मेट्रो मार्गिका-३ हा केवळ एक वाहतूक प्रकल्प नाही, तर शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
 
 
 
या मार्गिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ती अत्याधुनिक ७५० व्होल्ट ‘डीसी थर्ड-रेल’ विद्युतीकरण प्रणालीवर चालणारी देशातील पहिली सार्वजनिक-खाजगी भागीदारीत उभारलेली मेट्रो ठरणार आहे; मात्र या प्रकल्पाचे महत्त्व केवळ तांत्रिक नवकल्पनांपुरते मर्यादित नाही. त्यातून भारताच्या शहरी नियोजनातील बदलती विचारसरणीही स्पष्ट होते. पुणे शहराची सर्वांत मोठी समस्या म्हणजे वाहतूक. हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दररोजचा प्रवास ही एक मानसिक आणि शारीरिक परीक्षा बनली आहे. केवळ २० ते २५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागणे, ही कोणत्याही विकसित शहरासाठी अभिमानाची बाब नाही. वाहतुकीत अडकून पडणारा वेळ हा केवळ वैयक्तिक तोटा नसतो, तर उत्पादकतेवर, उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणारा घटक असतो. या पृष्ठभूमीवर हिंजवडी ते शिवाजीनगर अवघ्या ४५ मिनिटांमध्ये जोडण्याचा दावा करणारी मेट्रो मार्गिका निश्चितच आशादायी वाटते.
  
या प्रकल्पाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘थर्ड-रेल’ विद्युतीकरण प्रणाली. भारतातील बहुतांश मेट्रो प्रकल्पांमध्ये ओव्हरहेड वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जातो. पुणे मेट्रो मार्गिका-३ मध्ये मात्र रेल्वेरुळालगत असलेल्या स्वतंत्र विद्युतवाहक रेलद्वारे गाड्यांना वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रथमदर्शनी हा बदल तांत्रिक वाटत असला, तरी त्याचे परिणाम दूरगामी आहेत. शहरात उंच खांब आणि विजेच्या तारा नसल्यामुळे दृश्य प्रदूषण कमी होईल. देखभाल खर्चात बचत होईल. वीजपुरवठा अधिक स्थिर राहील. अत्याधुनिक सिग्नलिंग प्रणालीमुळे कमी अंतराने गाड्या चालवणे शक्य होईल. शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो मार्गिका-३ हा प्रकल्प केवळ एका शहराचा नाही, तर भारतातील शहरी विकासाच्या नव्या मॉडेलचा प्रयोग आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी, अत्याधुनिक ‘थर्ड-रेल’ तंत्रज्ञान, ‘डिजिटल सिग्नलिंग’ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक या सर्व बाबी एकाच प्रकल्पात एकत्र आल्या आहेत. या प्रयोगाचे यश केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर देशातील इतर शहरांसाठीही दिशादर्शक ठरू शकते. म्हणजेच यातून प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल. आज जगातील अनेक आधुनिक महानगरांनी अशा प्रकारच्या प्रणालीचा स्वीकार केला आहे. भारतात कोलकाता आणि बंगळुरूच्या काही मार्गांवर हे तंत्रज्ञान वापरले जात असले, तरी पुणे मार्गिका-३ मध्ये त्याचा व्यापक वापर होणार आहे. त्यामुळे पुणे हे केवळ आणखी एक मेट्रो शहर न राहता नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे शहर म्हणूनही ओळखले जाईल.
 
 
या प्रकल्पाची आणखी एक विशेष बाब म्हणजे तो सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारला जात आहे. भारतातील बहुतांश मेट्रो प्रकल्प सरकारी निधीतून उभारले गेले. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा सार्वजनिक पैसा खर्च झाला. पुणे मार्गिका-३ मात्र डिझाईन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि हस्तांतरण (डीबीएफओटी) या मॉडेलवर विकसित होत आहे. त्यामुळे खागी गुंतवणूक, तांत्रिक कौशल्य आणि सरकारी नियमन यांचा संगम या प्रकल्पात दिसतो. हा प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात देशातील इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो; मात्र कोणत्याही मोठ्या पायाभूत प्रकल्पाकडे केवळ कौतुकाच्या नजरेने पाहणे पुरेसे नाही. त्याच्या अंमलबजावणीची गती, खर्च, वेळापत्रक आणि प्रत्यक्ष परिणाम यांचाही वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा लागतो. पुणे मेट्रोच्या विविध टप्प्यांमध्ये अनेकदा विलंब झाला. कोविड महामारी, जमिनीचे प्रश्न, तांत्रिक बदल आणि प्रशासकीय प्रक्रिया यामुळे प्रकल्पाची मुदत वाढली. परिणामी, नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. आता पहिला टप्पा सुरू होत असताना सर्वांत मोठे आव्हान म्हणजे विश्वासार्ह सेवा देणे. केवळ उद्घाटन करून प्रकल्प यशस्वी होत नाही; तर त्यातून दररोज लाखो नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो का, हे पाहणे अधिक महत्त्वाचे असते. पुणेकरांनी यापूर्वीही अनेक मोठे प्रकल्प पाहिले आहेत. उड्डाणपूल बांधले गेले, रस्त्यांचे रुंदीकरण झाले, बस रॅपिड ट्रान्झिट प्रणाली उभारण्यात आली; परंतु अनेक ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसले नाहीत. त्यामुळे नागरिक आता घोषणांपेक्षा प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व देतात.
 
मेट्रो मार्गिका-३ लाही हीच कसोटी पार करावी लागणार आहे. या प्रकल्पाचे यश केवळ मेट्रोच्या गाड्या चालवण्यावर अवलंबून राहणार नाही. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित पदपथ, सायकल मार्ग, बसेस, पार्किंग सुविधा आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) सक्षम व्यवस्था आवश्यक आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये मेट्रो असूनही लोक स्वतःची वाहने वापरतात, कारण स्थानकापर्यंत पोहोचणेच कठीण असते. पुण्यात ही चूक टाळावी लागेल. मेट्रो ही स्वतंत्र व्यवस्था नव्हे, तर संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा केंद्रबिंदू बनली पाहिजे. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले असता या प्रकल्पामुळे इंधनाची बचत, वाहतुकीतील वेळ कमी होणे आणि प्रदूषणात घट होणे हे तीन मोठे लाभ अपेक्षित आहेत. हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणाऱ्या लाखो वाहनांमुळे दररोज प्रचंड प्रमाणात इंधन जळते. त्यातून कार्बन उत्सर्जन वाढते. या वाहनांपैकी मोठा हिस्सा मेट्रोकडे वळल्यास पर्यावरणीय लाभही मोठा असेल. हवामानबदलाच्या काळात सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे हा पर्याय नसून गरज बनली आहे. मेट्रोमुळे शहराचा आर्थिक चेहरामोहराही बदलतो. जगभरातील अनुभव सांगतो, की मेट्रो स्थानकांभोवती व्यापारी केंद्रे, निवासी प्रकल्प आणि नवीन रोजगार निर्माण होतात. जमिनींचे मूल्य वाढते, गुंतवणूक वाढते. पुणे मार्गिका-३ मुळे हिंजवडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातही अशीच आर्थिक चैतन्याची अपेक्षा आहे; मात्र या विकासात नियोजनाचा अभाव राहिला, तर वाहतुकीच्या नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मेट्रोसह ‘ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक ठरेल.
 
 
या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. ‘कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) ही अत्याधुनिक डिजिटल सिग्नलिंग प्रणाली भविष्यात अधिक वारंवार सेवा आणि स्वयंचलित मेट्रो संचालनासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतातील शहरी वाहतुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल नियंत्रण आणि स्वयंचलित प्रणालींचा वाढता वापर ही सकारात्मक बाब आहे. भविष्यातील स्मार्ट शहरांसाठी अशी तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक ठरणार आहे. अर्थात, मेट्रो हा सर्व समस्यांवर रामबाण उपाय नाही. पुण्याची लोकसंख्या आणि शहराचा विस्तार पाहता बससेवा, उपनगरी रेल्वे, रिंग रोड, सायकल मार्ग आणि पादचारी सुविधा यांनाही समान प्राधान्य द्यावे लागेल. मेट्रो हा त्या व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. संपूर्ण व्यवस्था नव्हे. त्यामुळे विविध वाहतूक साधनांचे एकात्मीकरण हे पुढील दशकातील सर्वांत मोठे आव्हान असेल. पुणेकरांनी अनेक वर्षे वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषण सहन केले आहे. आता त्यांना आधुनिक, विश्वासार्ह आणि वेळेवर धावणारी सार्वजनिक वाहतूक हवी आहे. मेट्रो मार्गिका-३ त्या अपेक्षा पूर्ण करू शकली, तर ती केवळ प्रवासाचे साधन राहणार नाही, तर पुण्याच्या शहरी संस्कृतीत बदल घडवून आणणारी विकासरेषा ठरेल; मात्र त्यासाठी तंत्रज्ञानाइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण सेवा, प्रभावी व्यवस्थापन आणि नागरिकांचा विश्वास. शेवटी कोणत्याही मेट्रोचे यश उद्घाटनात नसते, तर रोज लाखो नागरिकांना ती किती सहज, सुरक्षित आणि वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचवते, यातच खरे मूल्य दडलेले असते.
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)