नवी दिल्ली
air india phuket-delhi flight एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली विमानातील गंभीर घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. ४ ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअरबस A320 विमानाची उंची अचानक सुमारे ३०० फूटांनी कमी झाली होती. त्यावेळी विमानात तीन मुलांसह १३७ प्रवासी आणि आठ क्रू सदस्य होते. काही क्षणांनंतर विमान स्थिर झाले आणि दिल्ली विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले. मात्र, या घटनेत २० प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्य जखमी झाले होते.
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) या घटनेचा तपास करत आहे. दरम्यान, तपासादरम्यान पायलट-इन-कमांडच्या अनिवार्य सायकोअॅक्टिव्ह-सब्स्टन्स स्क्रीनिंगमध्ये सुरुवातीचा निकाल ‘निगेटिव्ह’ आला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पायलटचा नमुना निर्धारित प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तेथे करण्यात आलेल्या पुष्टीकरण चाचणीत मारिजुआना अर्थात गांजाचे सेवन झाल्याचे आढळल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या तपासणीदरम्यान गोळा करण्यात आलेले काही रेकॉर्ड, जबाब, वैद्यकीय माहिती आणि अन्य सामग्री लागू तपासाच्या चौकटीअंतर्गत सुरक्षित आणि गोपनीय ठेवण्यात आली आहे.
विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आल्याने विमानातील परिस्थिती काही काळ अत्यंत गोंधळाची आणि भीतीदायक झाली होती. विमानाचा ताबा सहपायलटने घेतल्यानंतर ते दिल्लीला सुरक्षितपणे उतरवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या ड्रग टेस्टमध्ये मारिजुआनाची पुष्टी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आली. त्यामुळे विमानातील घटनेच्या तपासाला नवा आयाम मिळाला आहे.
या प्रकरणात पायलट-इन-कमांडच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तो डोप टेस्टमध्ये अपयशी ठरल्याचे आणि त्याने गांजाचे सेवन केल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर एआय २३७९ या विमानाच्या केबिन क्रूने पायलट-इन-कमांडच्या कथित ‘नशेत’ असलेल्या वर्तनाबाबत एअर इंडियाकडे तक्रार केल्याचेही सांगितले जात आहे. डीजीसीएच्या नियमांनुसार अशा पायलटला आवश्यकतेनुसार व्यसनमुक्ती उपचारासाठी पाठवावे लागतात आणि तो पूर्णपणे नशामुक्त असल्याचे प्रमाणित झाल्यानंतरच त्याला पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय पायलटविरोधात स्वतंत्र फौजदारी कारवाईलाही सामोरे जाण्याची शक्यता आहे.
विमानाची उंची अचानक कमी होत असताना पायलट-इन-कमांड सहपायलटच्या सीटच्या मागे उभे राहून वाकलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले जाते. एअरबस A320 काही क्षणांसाठी ‘निगेटिव्ह जी’ स्थितीत गेले. त्यामुळे पायलट-इन-कमांड तसेच कॉकपिटमध्ये ठेवलेल्या वस्तू हवेत वर उचलल्या गेल्या. सीट बेल्ट न लावलेल्या काही प्रवाशांना याचा फटका बसून ते जखमी झाले. या घटनेबाबत केबिन क्रूने एअर इंडियाकडे अहवाल सादर केला आहे. सहपायलटने पायलटच्या वर्तनाबाबत एअरलाइनच्या ग्राउंड कंट्रोलला माहिती दिली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर नेहमीच्या ब्रीथ अॅनालायझर चाचणीऐवजी कॉकपिट क्रूची ड्रग टेस्ट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने या घटनेच्या तपासाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. AAIB सर्व संबंधित तांत्रिक, ऑपरेशनल, वैद्यकीय आणि मानवी घटकांशी संबंधित पुरावे पद्धतशीरपणे गोळा करून त्यांचे जतन आणि परीक्षण करत असल्याचे सरकारने म्हटले आहे. डीजीसीएकडून सध्याच्या नियमांचा आढावा घेतला जात आहे. देशातील वरिष्ठ पायलटांनीही झोप किंवा चिंतेसाठी घेतलेल्या काही औषधांमुळे चाचणी पॉझिटिव्ह येणारे पायलट आणि प्रत्यक्ष सायकोअॅक्टिव्ह पदार्थांचे सेवन करणारे पायलट यांच्यात स्पष्ट फरक करण्याची मागणी केली आहे. काही औषधांमुळे गुंगी येऊ शकते, त्यामुळे उड्डाणाच्या काही तास आधी कोणती औषधे घेणे टाळावे, याची यादी एअरलाइन्सकडे उपलब्ध असते.
या घटनेमुळे एअर इंडियाच्या कामकाज आणि प्रशिक्षण व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. जून २०२५ मधील अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच या घटनेने एअरलाइनसमोरील आव्हाने वाढवली आहेत. विमानातील २० प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्य जखमी झाल्याने भारतीय विमान वाहतूक व्यवस्थेतील सुरक्षा आणि ड्रग टेस्टिंगच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डीजीसीए डोप टेस्टसंदर्भातील नियम अधिक कठोर करण्याच्या पर्यायांचा विचार करत आहे.
AAIBच्या तपासाबाबत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार, अशा तपासाचा उद्देश दोष निश्चित करणे नसून भविष्यात अपघात आणि गंभीर घटना टाळण्यासाठी कारणे आणि सुरक्षा सुधारणा ओळखणे हा असतो. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही निष्कर्ष अंतिम मानू नयेत, असेही तपास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.