अमरावती
amravati-university-phd-admission संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवी प्रवेश परीक्षा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे. पीएच.डी. प्रवेशासाठी इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज १३ ऑगस्टपासून करता येणार. इच्छुक उमेदवारांनी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावरील न्यूज ॲण्ड अनाऊन्समेंटमध्ये तसेच पीएच.डी. सेल या पोर्टलमध्ये उपलब्ध माहितीनुसार अर्ज करावा.
पेट-२०२६ साठी ऑनलाईन अर्ज https://sgbau.formsubmit.in या संकेतस्थळावरून भरता येणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरही (https://www.sgbau.ac.in) प्रवेश परीक्षेसंदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पेट परीक्षेची तारीख परीक्षेच्या सुमारे एक महिना अगोदर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस अगोदर उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संबंधित परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षा, पात्रता, अभ्यासक्रम, नियम व इतर आवश्यक सूचनांची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून काळजीपूर्वक वाचावी. अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची उमेदवारांनी विशेष दक्षता घ्यावी. पीएच.डी. संशोधनासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रे व माहिती तयार ठेवून वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.