ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीआधी बांगलादेशची चिंता दूर!

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
डार्विन,
bangladesh ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी बांगलादेश संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दास पहिल्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, १३ ऑगस्टपासून डार्विन येथे सुरू होणाऱ्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. दुखापतींच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या बांगलादेश संघासाठी लिटन दासचे फिट होणे महत्त्वाचे मानले जात आहे.
 
bangladesh
 
पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला बांगलादेशचा कर्णधार नाझमुल होसेन शांतो याने लिटन दासच्या फिटनेसबाबत माहिती दिली. लिटन पूर्णपणे तंदुरुस्त असून पहिल्या सामन्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो, असे शांतोने स्पष्ट केले. लिटनच्या समावेशामुळे संघाच्या फलंदाजीला निश्चितच बळ मिळेल, असेही त्याने सांगितले. दरम्यान, डार्विनमधील खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतरच अंतिम संघ निश्चित करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. खेळपट्टीची स्थिती पाहता दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांसह नेहमीच्या संयोजनाने खेळण्याची शक्यता असल्याचे शांतोने सांगितले. मात्र, सामन्याच्या सकाळी पुन्हा खेळपट्टीची पाहणी करून परिस्थितीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्याने स्पष्ट केले.
 
बांगलादेशसाठी ऑस्ट्रेलिया दौरा विशेष महत्त्वाचा आहे. २००३ नंतर बांगलादेश प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे दोन सामन्यांची ही मालिका संघासाठी मोठ्या आव्हानाची ठरणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीसाठी आपला अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे पुनरागमन झाले आहे. २०२५-२६ च्या ॲशेस मालिकेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या स्कॉट बोलँडला मात्र या सामन्यासाठी अंतिम संघात स्थान मिळालेले नाही.
 
बांगलादेशविरुद्धच्या डार्विन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम संघात जेक वेदरॉल्ड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, ॲलेक्स कॅरी, ब्यू वेबस्टर, मिचेल स्टार्क, कर्णधार पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांचा समावेश आहे. १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत बांगलादेश ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत किती कडवी झुंज देतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.