नौदलाच्या प्रत्येक युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात

संरक्षण विभागाची २०३० पर्यंतची योजना, पाकिस्तान-चीनला प्रत्युत्तर देण्याची तयारी

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
brahmos missiles भारतीय नौदल २०३० पर्यंत आपल्या बहुतांश युद्धनौकांवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात करणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, आतापर्यंत २० युद्धनौका या प्रणालीने सुसज्ज करण्यात आली आहेत. नवीन जहाजांवर ही प्रणाली आधीपासूनच असून चार वर्षांत इतर युद्धनौकांवर ब्रम्होस प्रणाली स्थापित करण्याची रणनीती संरक्षण विभागाने तयार केली. पाकिस्तान-चीनच्या कुरापतीला प्रत्युत्तर देणे याचा उद्देश आहे.
 
 
brahmos missiles
  
भारतीय नौदल आपल्या आघाडीच्या युद्धनौकांवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र बसवण्याच्या प्रक्रियेला गती देत आहे. येत्या काही वर्षांत नौदलाच्या प्रत्येक युद्धनौकांवर हे क्षेपणास्त्र तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. नौदल २०३० पर्यंत प्रमुख युद्धनौकांवर ब्रह्मोसची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली. गेल्या वर्षभरात सहापेक्षा जास्त ब्रह्मोस-सक्षम युद्धनौका नौदलात सामील झाल्या असून, त्यांची एकूण संख्या जवळपास २० झाली आहे. सर्व नवीन युद्धनौका ब्रह्मोस प्रणालीने सुसज्ज आहेत. विद्यमान जहाजांवरही काम सुरू आहे. सागरी हल्ल्याची क्षमता मजबूत करण्यासाठी हे क्षेपणास्त्र एक महत्त्वाचे शस्त्र आहे. ब्रह्मोस आता केवळ चाचण्या आणि सरावांपुरते मर्यादित राहिलेले नाही, त्याने प्रत्यक्ष मोहिमांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याचा सुपरसॉनिक वेग आणि लांब पल्ल्याची क्षमता शत्रूच्या जहाजांवर आणि किनारपट्टीवरील लक्ष्यांवर जलद हल्ले करण्यास सक्षम आहे.
 
स्वदेशी सामग्रीचा वाप
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ब्रह्मोसची क्षमता जगाने अनुभवली. या मोहिमेत क्षेपणास्त्राने आपली अचूकता आणि परिणामकारकता सिद्ध केली. यानंतर, नौदलाने त्याचा व्यापक स्वीकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय युद्धनौकांची नवीनतम पिढी ब्रह्मोस क्षमतेचा विचार करून डिझाइन केली जात आहे. आयएनएस उदयगिरी, आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस महेंद्रगिरी यांसारख्या निलगिरी-श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेट्स आठ उभ्या प्रक्षेपित होणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
हल्ल्याच्या क्षमतेत सातत्याने वाढ
विनाशकांच्या काही नवीन मॉडेल्समध्ये १६ पर्यंत उभ्या प्रक्षेपित करणाऱ्या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे, तर जुन्या मॉडेल्समध्ये आठ आहेत. अशाप्रकारे, नौदल आपल्या ताफ्याची हल्ला क्षमता सातत्याने वाढवत आहे. सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने युद्धनौकांसाठी २२० हून अधिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली. नौदलाच्या ताफ्यात या क्षेपणास्त्राची उपस्थिती आणखी वाढवण्यासाठी अतिरिक्त फायर कंट्रोल प्रणाली आणि व्हर्टिकल लाँचर्सना मंजुरी देण्यात आली. या क्षेपणास्त्राचे जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून प्रक्षेपित होणारे प्रकार आधीपासूनच उपलब्ध आहेत.