नवी दिल्ली,
delhi pune flight due to ac failure दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानात वातानुकूलन यंत्रणा (एसी) बंद पडल्याने गोंधळ उडाला. एसजी-१०५ हे विमान मंगळवारी रात्री दिल्लीच्या टर्मिनल १ वरून पुण्याला जाणार होते. सुमारे दीड तासाच्या विलंबानंतर प्रवासी विमानात चढले तेव्हा त्यांना तीव्र उष्णता आणि दमटपणाचा सामना करावा लागला. प्रवाशांचा आरोप आहे की, विमानातील परिस्थिती इतकी बिकट होती की, श्वास घेणेही कठीण झाले़ त्यामुळे संतप्त प्रवाशी जीव गुदमरतोय, दरवाजा उघडा, अशी मागणी करत होते.

हे विमान मंगळवारी रात्री ९:४५ च्या सुमारास सुटणार होते़ परंतु ते १०:३० वाजेपर्यंत टाळण्यात आले़ विमानात चढल्यानंतर प्रवाशांनी वातानुकूलन यंत्रणा बिघडल्याची तक्रार केली. उष्णता आणि दमटपणा वाढत गेला आणि प्रवाशांचा संयम सुटू लागला. परिस्थिती अधिकच बिघडल्याने १०० हून अधिक प्रवाशांनी विमानात चढण्यास नकार दिला आणि विमान परत आणण्याची मागणी केली. प्रवाशांच्या विरोधानंतर विमान परत आणण्यात आले. सुमारे १५० प्रवाशांशी संबंधित या घटनेमुळे अखेरीस दिल्ली-पुणे विमानसेवा रद्द करण्यात आली. प्रवाशांना विमानतळावर अनेक तास थांबावे लागले़ सुमारे सहा तासांनंतर त्यांच्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली़ त्यामुळे ते बुधवारी सकाळी पुण्यात पोहोचले.
झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने मागितली माफी
स्पाईसजेटने सांगितले की, विमानात तांत्रिक बिघाड झाला होता़ प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही माफी मागताे़ तथापि, विमानाचा एसी खराब असताना त्यांना इतका वेळ उष्ण आणि गैरसोयीच्या केबिनमध्ये का ठेवण्यात आले, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. आता हा मुद्दा केवळ विमान उड्डाणाला होणारा विलंब किंवा ते रद्द होण्यापुरता मर्यादित नाही, तर तो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि आरामाचा आहे. उड्डाणापूर्वी विमानाच्या सर्व महत्त्वाच्या प्रणालींची किती कसून तपासणी करण्यात आली होती?, असे प्रश्नही प्रवाशांनी उपस्थित केले़