अनिल कांबळे
नागपूर,
cyber scam शहरात सायबर फसवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना ९० कोटी २५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या मोठ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पदार्फाश केला. या प्रकरणी पोलिसांनी महिलांसह ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध बँकांचे २३६ एटीएम कार्ड, ८५ चेकबुक, ८२ पासबुक, ४५ सिम कार्ड, तसेच ओळखपत्रे व इतर साहित्य जप्त केले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान हुडकेश्वर पिपला रोड आणि दिघोरी नाका परिसरातील ठिकाणांवर धाडी टाकून ही कारवाई केली. हे आरोपी विविध व्यक्तींच्या नावावर बेकायदेशीरपणे बँक खाती उघडून त्या खात्यांचा वापर सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीचे पैसे जमा करण्यासाठी करत असल्याचे उघड झाले आहे. अटकेतील आरोपींमध्ये उज्ज्वला ताराचंद राजगिरे (३२, मौदा), इरफान इक्बाल शेख (३२, भंडारा), मृणाली दिगांबर कांबळे (२६, गोधनी), निधीता अमित रामटेके (२२), आयुष चंद्रकांत रामटेके (२०) आणि आदित्य राहुल दुपारे (२०, सर्व रा. नागपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना १० आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात या बँक खात्यांशी संबंधित संपूर्ण महाराष्ट्रासह विविध राज्यांत १०४ पेक्षा जास्त तक्रारी दाखल असल्याचे समोर आले आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी कनेक्शन असण्याची दाट शक्यता असून, पोलिस आयुक्त डॉ. विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पथक पुढील सखोल तपास करत आहे.