नवी दिल्ली
delhi igi airport नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) सुरक्षा तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला. प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेकदरम्यान सतर्क केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी एका प्रवाशाच्या हँडबॅगेत लपवून ठेवलेली माकडाची कवटी जप्त केली. या प्रकारामुळे विमानतळ परिसरात काही काळ खळबळ उडाली.
संबंधित प्रवाशाला दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाने प्रवास करायचा होता. विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणी सुरू असताना CISF कर्मचाऱ्यांना त्याच्या हँडबॅगेत एक संशयास्पद वस्तू आढळली. त्यानंतर बॅगेची सखोल तपासणी केली असता आत लपवून ठेवलेली कवटी सापडली. त्यासोबत चांदीच्या नक्षीकामाने सजवलेली एक विचित्र प्रकारची लाकडी काठीही आढळून आली.
चौकशीदरम्यान प्रवाशाने CISF कर्मचाऱ्यांना जप्त करण्यात आलेली कवटी माकडाची असल्याचे सांगितले. वन्यजीवाशी संबंधित वस्तू आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन्यजीव संरक्षणाशी संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली.
CISFने संबंधित प्रवाशाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. जप्त करण्यात आलेली माकडाची कवटीही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही वस्तू वन्यजीवाशी संबंधित असल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे.
दरम्यान, विमानतळावर माकडाची कवटी सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबतही सतर्कता वाढवण्यात आली आहे. ही कवटी प्रवाशाकडे नेमकी कुठून आली आणि ती विमानातून नेण्यामागील त्याचा उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाच्या तपासातून वन्यजीवाशी संबंधित वस्तू विमानतळाच्या सुरक्षा तपासणीपर्यंत कशा पोहोचल्या, याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.