मुल्ला, (गोंदिया)
tribal-development-project- गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत घडलेल्या सर्पदंश व विद्यार्थीनींच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेत देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेबाबत कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत प्रकल्प अधिकारी नितीन ईशोकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवरी प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील 34 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
आदिवासी विकास प्रकल्प विभागाकडून या तपासणीसाठी कर्मचार्यांची विशेष पथके तयार करण्यात आली असून, 23 अनुदानित आणि 11 शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, केवळ कागदोपत्री नोंदी तपासण्याऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार्या सुविधा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या भोजनाचा दर्जा, स्वयंपाकघराची स्वच्छता, वसतिगृहाची अवस्था, पिण्याचे पाणी, झोपण्याची व्यवस्था, पलंग, अंथरूण-पांघरूण तसेच परिसरातील सुरक्षाव्यवस्थेची तपासणी केली जाणार आहे. मुख्याध्यापक व संस्थाचालकांना स्वच्छता, भोजन आणि निवासव्यवस्थेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आश्रमशाळांच्या परिसरात सर्पदंशाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा व औषधांची उपलब्धता तपासण्यासोबतच परिसरात भटक्या जनावरांचा प्रवेश रोखण्यासाठीही उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जपतलाई घटनेनंतर सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे आश्रमशाळांमधील व्यवस्थापनाचे धाबे दणाणले असून, तपासणीत नेमक्या कोणत्या त्रुटी समोर येतात आणि त्यावर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
मकरधोकडा आश्रमशाळेत धडक
या मोहिमेची तीव्रता 11 ऑगस्ट रोजी मकरधोकडा येथील अनुदानित आश्रमशाळेतील आकस्मिक भेटीतून दिसून आली. प्रकल्प अधिकारी नितीन ईशोकर यांनी रात्री सुमारे 8 वाजता आश्रमशाळेत अचानक भेट देऊन वसतिगृह, भोजन व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या झोपण्याच्या सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष निवासव्यवस्थेचा आढावा घेत मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित व पुरेशी झोपण्याची सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पलंग, अंथरूण किंवा पांघरूणाची कमतरता आढळल्यास प्रकल्प कार्यालयाला तातडीने कळविण्याचे निर्देश आश्रमशाळांचे संचालक व मुख्याध्यापकांना देण्यात आले असून, आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
नितीन ईशोकर, प्रकल्प अधिकारी, देवरी