गाडगेबाबा समाधीस्थळाचा २५ कोटींतून विकास

राज्य शासनाची आराखड्याला मंजुरी

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
अमरावती
sant-gadge-baba-samadhi-site विदर्भातील प्रमुख धार्मिक व सामाजिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध अमरावती येथील संत गाडगेबाबा समाधीस्थळ परिसराच्या सुशोभीकरणासाठी एकूण २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात मागील २० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई स्थित सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार सुलभा संजय खोडके यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

gadge baba 
 
विकास आराखडा निधीतून संत गाडगेबाबा समाधीचा जीर्णोद्धार व परिसराचे साैंदर्यीकरण, कुंताबाई समाधीचे सुशोभीकरण, कीर्तन सभागृह व ध्यान केंद्र तसेच विलोभनीय उद्यान अशी अनेक कामे अंतर्भूत आहेत. संत गाडगेबाबांचे साहित्य व स्मृतीचे जतन करून समाधी स्थळाचा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विकास आराखडा मंजूर करून निधी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास आराखड्याचा आढावा घेतला. या बैठकीत आ. खोडके यांनी अर्धवट कामे यासह प्रस्तावित समाविष्ट कामासंदर्भात बैठकीमधून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकास आराखड्यास मंजुरी देऊन या निधी अंतर्गत सर्व उर्वरित व प्रस्तावित कामे गतीने पूर्ण करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधून निर्देशित केले.
 
आता संत गाडगेबाबा समाधी स्थळ येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. ज्यामध्ये संत गाडगे महाराज स्मृती केंद्रचे उर्वरित बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. तसेच स्मृती भवन परिसरात ’शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटर’च्या तळमजल्याचे नवे बांधकाम. भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम. प्रबोधनासाठी अद्ययावत कीर्तन सभागृह व ध्यान केंद्र इमारत., अंतर्गत रस्ते, वाहनतळ आणि आकर्षक उद्यान उभारण्यात येतील. या निधीमुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या समाधी स्थळांचा चेहरामोहरा बदलणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आराखडा मंजूर केल्याबद्दल आ. सुलभा खोडके यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहे.