मुंबई
dhadpad movie मराठी सिनेसृष्टीत आजवर विविध विषयांना रुपेरी पडद्यावर स्थान मिळाले आहे. आता ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाची संघर्षमय वाटचाल, स्वप्ने आणि ती साकारण्यासाठी सुरू असलेली धडपड यांचे प्रभावी चित्रण करणारा ‘धडपड’ हा आगामी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला नुकतीच आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे सुरुवात झाली. स्त्रीप्रधान विषय असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
बोधी सिनेमा प्रस्तुत आणि अश्विनी समाधान ऐवळे निर्मित या सिनेमाची कथा बालाजी वाघमोडे यांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुभवी तंत्रज्ञांची टीम कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फुला’ या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक जावीर हेच ‘धडपड’चे दिग्दर्शन करणार आहेत. क्रिएटिव्ह डायरेक्टर अनुप जगदाळे, कॅमेरामन वीरधवल पाटील, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, वेशभूषा दिपाली देशमुख, नेपथ्य स्वाती थोरात, कार्यकारी निर्माता कल्पेश जगताप आणि संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे हे चित्रपटासाठी काम पाहणार आहेत.
स्मिता तांबे यांच्यासह अभिनेते किशोर चौगुले, कुशल बद्रिके, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल, अश्विनी कासार, प्रभाकर मोरे आणि रोहित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाभोवती ‘धडपड’चे कथानक फिरते. कर्त्या पुरुषाच्या कर्मदरिद्रीपणामुळे स्वप्नांची होणारी राख, त्यातून कुटुंबावर ओढवणारी संकटे आणि या प्रतिकूल परिस्थितीतही संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रीची कहाणी या चित्रपटातून भावनिक आणि वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आली आहे.
कुटुंब आणि आपल्या रानासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्त्रीची संघर्षगाथा हा या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे. त्याचबरोबर गावातील राजकारण, महिला नेतृत्व, राजकीय कुरघोड्या आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सामान्य माणसाची होणारी पिळवणूक यावरही ‘धडपड’ भाष्य करणार आहे.