चेन्नई,
Emergency landing of Indigo flight कोलकाताहून चेन्नईकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-723 या विमानाच्या इंजिनमध्ये लँडिंगपूर्वी बिघाड झाल्याने चेन्नई विमानतळावर खळबळ उडाली. विमानात २२४ प्रवासी होते. पायलटने इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती दिल्यानंतर विमानतळावर रात्री ११:२९ वाजता पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी विमानतळावरील अग्निशमन दलासह सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानाच्या मार्गावर आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रात्री ११:३७ वाजता इंडिगोच्या विमानाने रनवे २५ वर सुरक्षितपणे लँडिंग केले.

विमानातील सर्व २२४ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरवल्यानंतर विमानतळ प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.चेन्नई विमानतळावर या विमानाचे नियोजित आगमन रात्री ११:३० वाजता होणे अपेक्षित होते. मात्र, इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विमानाने रात्री ११:३७ वाजता लँडिंग केले. विमान सुरक्षितपणे उतरवल्यानंतर विमानतळावर लागू करण्यात आलेली पूर्ण आणीबाणी रात्री ११:४७ वाजता अधिकृतपणे मागे घेण्यात आली. त्यानंतर विमानतळावरील हवाई वाहतूक आणि इतर कामकाज पूर्ववत करण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, घटनेनंतर चेन्नई विमानतळावरील सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहे.