‘डॉन 3’वरून रणवीर-फरहान वाद पुन्हा चर्चेत

“चित्रपटातून ऐनवेळी माघार घेणं हा पॅटर्नच”

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
मुंबई
farhan akhtar ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘दिल चाहता है’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फरहानने कलाकारांच्या तारखांशी संबंधित अडचणींचा किस्सा सांगताना अप्रत्यक्षपणे रणवीरला टोला लगावल्याची चर्चा आहे. “चित्रपटातून ऐनवेळी माघार घेणं हा आजकाल एक पॅटर्नच बनला आहे”, असे वक्तव्य फरहानने केले. त्याने थेट रणवीरचे नाव घेतले नसले, तरी त्याचा इशारा ‘डॉन 3’मधून रणवीरने घेतलेल्या माघारीकडे असल्याचे बोलले जात आहे.
 

farhan akhtar takes indirect dig at ranveer singh over don 3 exit 
‘डॉन 3’च्या शूटिंगच्या काही दिवस आधी रणवीरने या प्रोजेक्टमधून अचानक माघार घेतली होती. २०२३ मध्ये निर्मात्यांकडून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती आणि त्यात रणवीर सिंह डॉनची मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, नंतर काही मतभेद निर्माण झाल्यानंतर रणवीरने शूटिंग सुरू होण्याच्या काही दिवस आधीच या चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांना मोठा फटका बसला. या प्रकरणी फरहानने रणवीरविरोधात ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडे (FWICE) तक्रारही केली होती.
फेडरेशनच्या बैठकीनंतर रणवीरविरोधात इंडस्ट्रीत असहकाराचे आदेश जारी करण्यात आले होते. रणवीरने अचानक माघार घेतल्यामुळे निर्मात्यांचे ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‘डॉन 3’वरून निर्माण झालेला हा वाद अद्याप पूर्णपणे मिटलेला नसल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ‘दिल चाहता है’ला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फरहानने या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळातील एक किस्सा सांगितला. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. कलाकारांच्या तारखांची जुळवाजुळव करताना त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या चित्रपटासोबतच्या शूटिंग शेड्युलमुळे अडचणी निर्माण होत असल्याने सैफ अली खान ‘दिल चाहता है’मधून माघार घेण्याचा विचार करत होता, असा खुलासा फरहानने केला.
या प्रसंगाचा उल्लेख करताना फरहान म्हणाला, “माझ्यासाठी ती अत्यंत वाईट गोष्ट होती. शूटिंग सुरू होण्यासाठी दहा दिवस नाही तर जवळपास एक महिना बाकी होता आणि आजकाल हे असं सतत घडताना दिसतं.” फरहानच्या या वक्तव्याला रणवीर सिंहसोबतच्या ‘डॉन 3’च्या वादाची पार्श्वभूमी असल्याने त्याचा हा अप्रत्यक्ष टोला रणवीरकडेच असल्याची चर्चा रंगली आहे.दरम्यान, रणवीर सिंहच्या टीमने फरहान अख्तर आणि इतर संबंधित व्यक्तींसोबत मिळून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. रणवीरकडून एक्सेल एंटरटेन्मेंटला ३५ कोटी रुपयांची मोठी ऑफरही देण्यात आली होती. मात्र, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी ही ऑफर नाकारल्याचे सांगितले जाते. रणवीरने चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे फरहान आणि रितेश यांच्या निर्मिती संस्थेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘डॉन 3’च्या निमित्ताने सुरू झालेला रणवीर-फरहान वाद आता फरहानच्या या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.