नवी दिल्ली,
Flood of Spam in India देशभरात वाढत असलेल्या स्पॅम कॉल्स आणि फसव्या संदेशांमुळे दूरसंचार क्षेत्रासह सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांत तब्बल २४.४ अब्जांहून अधिक स्पॅम कॉल्स आणि संदेशांची नोंद झाली. दररोजच्या सरासरीचा विचार केला तर हा आकडा सुमारे २६ कोटी स्पॅम संदेश आणि कॉल्स इतका आहे.स्पॅमच्या या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दूरसंचार कंपन्या आणि ट्रायने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणांचा वापर वाढवला आहे. या प्रणालीच्या मदतीने २२.९९ अब्ज संशयास्पद कॉल्सची ओळख पटवण्यात आली. हे देशातील एकूण येणाऱ्या कॉल्सच्या सुमारे ३.२ टक्के आहेत. याशिवाय, एआय प्रणालीने १.४४ अब्जांहून अधिक संशयास्पद स्पॅम संदेश शोधून त्यांना चिन्हांकित केले किंवा त्यांचा मागोवा घेतला.

स्पॅमच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करत सरकार आणि ट्रायने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दूरसंचार संसाधनांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहेत. आतापर्यंत १८.३ दशलक्षांहून अधिक दूरसंचार संसाधने ब्लॉक करण्यात आली आहेत. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे १३.७ दशलक्षांहून अधिक क्रमांक १५ दिवसांसाठी बंद करण्यात आले. वारंवार नियम मोडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांशी संबंधित ४६,७८६ कनेक्शन्सवर एक वर्षासाठी कारवाई करण्यात आली.मोठ्या प्रमाणावर स्पॅम आणि फसवे संदेश पाठवणाऱ्या २६३ जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. याशिवाय, गैरवापरासाठी वापरले जाणारे २,८७३ एसएमएस हेडर्स कायमस्वरूपी ब्लॉक करण्यात आले आहेत. स्पॅमविरोधी नियमांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याबद्दल रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या प्रमुख दूरसंचार कंपन्यांवर ट्रायने कोट्यवधी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
सुरक्षा यंत्रणांसाठी मात्र या प्रकरणातील सर्वात मोठी चिंता म्हणजे स्पॅमचा वापर केवळ जाहिराती किंवा व्यावसायिक संदेशांसाठी होत नसल्याचे समोर येत आहे. सायबर गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर अशा कॉल्स आणि संदेशांचा वापर केला जात असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.बँक खात्यांशी संबंधित फसवणूक, बनावट केवायसी अपडेट, खोट्या कर्जाच्या ऑफर्स आणि यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांसाठी अशा संदेशांचा वापर केला जातो. अनेकदा फसवणूक करणारे सरकारी अधिकारी, बँक कर्मचारी किंवा नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांशी संपर्क साधतात. त्यानंतर वैयक्तिक माहिती किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. स्पॅम कॉल्स आणि संदेशांचे एवढे मोठे प्रमाण केवळ ग्राहकांना होणाऱ्या त्रासापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यातून आर्थिक फसवणुकीचा धोका वाढत असून, देशाच्या डिजिटल व्यवहार व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वासही प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संशयास्पद कॉल्स आणि संदेश शोधण्यासोबतच दूरसंचार कंपन्यांवर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही वाढली आहे.