भूस्खलनाचा कहर दोन जणांचा मृत्यू, मलब्याखाली ६ ते ८ जण अडकल्याची शक्यता

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
मुंबई
ghatkopar landslide मुंबईत मुसळधार पावसामुळे घाटकोपर परिसरात बुधवारी पहाटे भीषण भूस्खलनाची घटना घडली. घाटकोपर-कुर्ला रोडलगतच्या अशोक नगर परिसरात पहाटे सुमारे ३ वाजून ४८ मिनिटांनी झालेल्या भूस्खलनामुळे गौसिया चाळीतील अनेक घरांवर मलबा कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी ६ ते ८ जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मलबा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
 

mumbai rain ghatkopar landslide buries homes, 2 dead, several feared trapped 
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मलबा हटवून त्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. दुर्घटनेनंतर अशोक नगर परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मलब्यातून आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मलब्याखाली किती जण अडकले आहेत, याबाबत सुरुवातीला वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी तीन ते चार जण अडकल्याची शक्यता सांगितली होती. मात्र, त्यानंतर बीएमसीने ६ ते ८ जण मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली. बचाव पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांची ओळख १८ वर्षीय सोहेल अन्सारी आणि १४ वर्षीय मोहम्मद अन्सारी अशी झाली आहे. दोघांच्या पायांना किरकोळ दुखापत झाली असून, भूस्खलनानंतर परिसरातील परिस्थितीबाबत त्यांनी माहिती दिली.
 
 
उपपोलीस आयुक्त (DCP) गणेश शिंदे यांनीghatkopar landslide  मुसळधार पावसामुळे अशोक नगर परिसरात भूस्खलन झाल्याचे सांगितले. मलब्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू असल्याचे स्पष्ट केले. बीएमसी, एनडीआरएफ आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, मान्सूनपूर्व काळात परिसरातील अनेक घरांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, अशी माहिती अधिकारी गजानन जैतापकर यांनी दिली. सध्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून, पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जात आहे. गरज भासल्यास बाधित परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांतील घरे आणि वस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.दरम्यान, यापूर्वीही मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक परिसरात भूस्खलन झाले होते. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर टनेल क्रमांक २ च्या खंडाळा एक्झिटजवळ भूस्खलन झाल्याने वाहतूक वळवावी लागली होती. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यावेळी वाहतुकीबाबत सूचना जारी केल्या होत्या.