नवी दिल्ली
heavy rain expected भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बुधवार, १२ ऑगस्ट रोजी देशाच्या अनेक भागांत दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय राहणार असून विविध राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थानमध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता असून काही भागांत अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि ओडिशातील काही भागांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या २४ तासांत देशातील अनेक भागांत व्यापक पाऊस झाला असून, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर आणि मध्य भारतात १५ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह या भागांत पावसाचा सिलसिला सुरूच राहणार आहे. डोंगराळ राज्यांमध्ये १७ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर देशातील अनेक भागांत पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
बुधवारी दिल्ली, राजस्थान आणि मध्य भारतातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. पूर्व राजस्थानमध्ये तुलनेने अधिक पाऊस होण्याचा अंदाज असून छत्तीसगड, उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, गुजरात, ओडिशा आणि ईशान्य भारतातील काही भागांतही मुसळधार पाऊस पडू शकतो. दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाची शक्यता कायम असून हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर अनेक राज्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पावसाची शक्यता कायम
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामागे उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत ठरत आहे. त्याचबरोबर मान्सूनचा ट्रफ सध्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. मान्सूनच्या पावसाला चालना देणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे.दरम्यान, १२ ऑगस्टच्या आसपास उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या हवामान प्रणालीमुळे आगामी काळात पूर्व आणि मध्य भारतातील काही भागांत पावसाची स्थिती कायम राहण्यास मदत होऊ शकते. पुढील आठवड्यात पश्चिम हिमालय, ओडिशा, गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मध्य प्रदेश तसेच कोकण-गोवा या भागांतही चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दक्षिण भारतातही पावसाची शक्यता heavy rain expected कायम आहे. किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणातील काही भागांत तुरळक पाऊस तसेच मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. देशातील अनेक भागांत सुरू असलेले पावसाचे हे सत्र तातडीने संपण्याची चिन्हे नसून, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.