पाकिस्तान
imran khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इम्रान खान यांच्या आरोग्य आणि सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करातील सूत्रांचा हवाला देत इम्रान खान यांचा कोठडीत मृत्यू झाल्याचा दावा केल्याने पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या दाव्यानंतर PTI ने तातडीने निवेदन जारी करत सरकारकडे इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट आणि पारदर्शक माहिती देण्याची मागणी केली आहे.
वजाहत सईद खान यांच्या अहवालात इम्रान खान यांच्या कथित मृत्यूचा दावा करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली. इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत यापूर्वीही विविध प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच त्यांना कुटुंबीय, वकील आणि पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची परवानगी मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे ताज्या दाव्यामुळे पाकिस्तानातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.
PTI च्या केंद्रीय प्रसारमाध्यम विभागाने ‘एक्स’वरील निवेदनातून या वृत्तांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. इम्रान खान हे केवळ राजकीय कार्यकर्ते नसून लाखो पाकिस्तानी नागरिकांचे लोकप्रिय आणि निवडून आलेले नेते असल्याचे पक्षाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची खरी माहिती देशासमोर आणणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचे PTI ने स्पष्ट केले.इम्रान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत आणि सध्या रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसह ९ मे २०२३ रोजी झालेल्या हिंसाचार आणि निदर्शनांशी संबंधित दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत दाखल असलेल्या अनेक खटल्यांनाही ते सामोरे जात आहेत. त्यांच्या आरोग्याबाबत सातत्याने चिंता व्यक्त होत असतानाही प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीची पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप PTI कडून करण्यात आला आहे.
दरम्यान, पक्षाने सरकारकडे इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबीय, वैयक्तिक डॉक्टर, वकील आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांना तातडीने भेटण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सर्वसमावेशक वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात यावेत, अशीही मागणी पक्षाने केली आहे.
इम्रान खान यांच्या मृत्यूबाबतचा दावा अधिकृतरीत्या स्पष्ट होईपर्यंत परिस्थितीबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची माहिती पारदर्शकपणे जाहीर करण्याची मागणी PTI कडून करण्यात आल्याने पाकिस्तानातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.