गोंदिया
fda-action राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची व्यापक तपासणी मोहीम राबविताना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गोंदिया जिल्ह्यातील चार आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० तसेच नियम १९४५ अंतर्गत परिशिष्ट-‘टी’मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने या चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मे, जून व जुलै-२०२६ या कालावधीत गोंदिया जिल्ह्यातील अंग्रास आयुर्वेद (वाडेगाव, ता.तिरोडा), आदित्य फार्मास्युटिकल्स (गराडा, ता. तिरोडा), लालशाह सेंद्रिय उत्पादने (पिंडकेपर, कारंजा) आणि हिलॅरियस आयुर्वेद (गोंदिया औद्योगिक क्षेत्र) व पाठक आयुर्वेदिक फार्मसी (रेलटोली, गोंदिया) या पाच आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. दरम्यान, तपासणीनंतर अंग्रास आयुर्वेद, आदित्य फार्मास्युटिकल, लालशाह सेंद्रिय उत्पादने आणि हिलॅरियस आयुर्वेद या चार कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. तर पाठक आयुर्वेदिक फार्मसी यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटिसीवरील कार्यवाही अद्याप सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे, कारवाईपूर्वी संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यात कंपन्यांनी लेखी खुलासे सादर केले असले तरी आढळलेल्या उल्लंघनांचे गांभीर्य लक्षात घेऊन औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने नमूद केले. तर निकृष्ट दर्जाचे किंवा नियमबाह्य पद्धतीने उत्पादित होणारी औषधे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे भविष्यातही अशा उत्पादकांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
आढळलेल्या प्रमुख त्रुटी ...
संबंधित कंपन्यांच्या तपासणीदरम्यान, मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्तीच्या अनुपस्थितीत औषध उत्पादन, चाचणी व विश्लेषण विभाग कार्यरत नसणे, बॅच उत्पादन, कच्चा माल व चाचणी नोंदी उपलब्ध नसणे, कच्चा माल व तयार औषधांच्या चाचणीची पद्धत नसणे, मंजूर नकाशानुसार उत्पादन परिसर नसणे, कर्मचार्यांच्या वैद्यकीय तपासणी व प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध नसणे, औषधांच्या लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक, औषधांच्या घटकांचे परस्पर मिश्रण टाळण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीचा अभाव, उपकरणांचे कॅलिब्रेशन न करणे, पॅकिंग मटेरियलची गुणवत्ता तपासणी व विश्लेषण न करणे या त्रुटी आढळून आल्या आहेत.