मुंबई,
Milk-cheese adulterers now makoka दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा भेसळखोरांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच संबंधितांविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची सूचनाही त्यांनी केली.‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.

बैठकीत तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. विशेषतः दूध, बनावट पनीर आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका लावण्याची भूमिका त्यांनी मांडली.खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे हा साधा गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. लहान मुले मोठ्या प्रमाणात दूधाचे सेवन करत असल्याने दुधातील भेसळीचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भेसळखोरांविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कायदेशीर त्रुटींमुळे कारवाई कमकुवत होऊ नये, यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यासाठी तातडीने विशेष कायदेशीर पथक स्थापन करण्याची सूचना शिंदे यांनी केली. दरम्यान, दूधातील भेसळ, बनावट पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळ करणाऱ्यांवर मकोका कारवाई करण्याची घोषणा सरकारकडून यापूर्वीही करण्यात आली आहे. प्रतिबंधित गुटख्याची विक्री, गोवंशाची बेकायदा वाहतूक आणि बेकायदा कत्तलीविरोधातही मकोका अंतर्गत कारवाईची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर आतापर्यंत किती जणांवर मकोका लावण्यात आला, याची अधिकृत आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही.