मुंबई
mirzapur the movie trailer बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांना ‘मिर्झापूर’च्या आयकॉनिक विश्वातील पुढील मोठ्या अध्यायाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीमिंग फ्रँचायझींपैकी एक असलेली ‘मिर्झापूर’ आता मालिकेच्या विश्वातून बाहेर पडत थेट मोठ्या पडद्यावर दाखल होत आहे. यावेळी भौकाल अधिक मोठा, विश्व अधिक भव्य आणि संघर्षाचे दांव पूर्वीपेक्षा अधिक उंच असणार आहेत. मिर्झापूरचा किंग, प्रिन्स आणि शेर पुन्हा एकदा परतले असून, यावेळी त्यांचा भौकाल मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
सीझन 1 नंतरची कथा पुढे नेत ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये फ्रँचायझीतील अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक पात्रे पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्यात कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू पंडित यांचा समावेश आहे. ट्रेलर प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच परिचित विश्वात घेऊन जातो, ज्याच्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले आहे. फ्रँचायझीची ओळख ठरलेली तीव्रता, डार्क ह्यूमर आणि लक्षात राहणारे संवाद यावेळीही कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, कथानकाचा आवाका यावेळी अधिक भव्य असल्याचे ट्रेलरमधून जाणवते.
या नव्या अध्यायाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा गादीसाठीची लढाई आहे. कथेत नव्या दावेदारांची एंट्री होत असून, ते जुन्या सत्तासंघर्षाला आव्हान देताना दिसणार आहेत. संघर्ष जसजसा तीव्र होत जातो, तसतसे ‘मिर्झापूर’चे विश्व पूर्वांचलाच्या पलीकडे विस्तारताना दिसते. यावेळी प्रेक्षकांना वाळवंटासह अधिक व्यापक आणि नव्या सिनेमॅटिक विश्वाची सफर घडणार आहे. चित्रपटात अनेक जुनी आणि प्रेक्षकप्रिय पात्रे पुन्हा परतणार असून, काही नवी पात्रेही या विश्वाचा भाग बनणार आहेत. त्यामुळे ‘मिर्झापूर’ फ्रँचायझी आणि तिच्या मोठ्या पडद्यावरील नव्या अध्यायातील नाते अधिक मजबूत होताना दिसत आहे.
या चित्रपटात पंकज त्रिपाठी, दिव्येंदू, अली फजल, जितेंद्र कुमार, रवि किशन, अभिषेक बॅनर्जी, रसिका दुग्गल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिलगांवकर, हर्षिता शेखर गौर, श्वेता त्रिपाठी, सोनल एस. चौहान, अनंगशा बिस्वास, शाजी चौधरी, सतेंद्र सोनी, कुलभूषण खरबंदा आणि सुशांत सिंह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज होणार असून, यंदाच्या सर्वात मोठ्या थिएट्रिकल इव्हेंट्सपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.