वर्धा,
mp amar kale राकाँ (शप) गटाच्या सर्व खासदारांनी पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी खासदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याची मागणी काळे यांनी केली. उपलब्ध निधीच्या मर्यादेमुळे अनेक विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याने स्थानिक पातळीवरील गरजा पूर्ण करण्यासाठी खासदार निधीत वाढ करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध प्रश्नांकडेही त्यांनी केंद्राचे लक्ष वेधले. शेतीमाल, शेतकर्यांच्या आर्थिक अडचणी आणि ग्रामीण भागातील विकासाच्या प्रश्नांवर केंद्राने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. विशेषत: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊनही अनेक लाभाथ्र्यांना निधी मिळण्यासाठी विलंब होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. घरकुल मंजूर झाले, मात्र निधीच्या प्रतीक्षेत लाभाथ्र्यांची घरे रखडली, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मंजूर घरकुलांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी काळे यांनी केली.
ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्राने गांभीर्याने पाहून पेन्शनधारकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. महाराष्ट्रातील केंद्रीय ओबीसी यादीत समावेशासाठी प्रलंबित असलेल्या २७ जातींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात या महापुरुषांचे योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा, अशी भूमिका खासदारांनी मांडली.