मुंबई
mumbai dadar spa raid मुंबईतील दादर परिसर नेहमीच नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी मंदिर नाट्यगृह तसेच आजूबाजूच्या रहिवासी भागामुळे या परिसरात दररोज मोठी वर्दळ असते. अशा संवेदनशील भागातील स्टार मॉलमधील एका स्पामध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी ‘रिबेल थाई स्पा’वर अचानक धाड टाकून कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान २५ ते ३० वयोगटातील सहा तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये महिला दलाल आशा परमार, ‘रिबेल थाई स्पा’चा मॅनेजर साहिल पिल्लई, कैलाश यादव आणि करण वर्धन यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने स्पामध्ये प्रवेश करताच तेथे सहा तरुणी आढळून आल्या. स्पाच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्या तरुणी, महिला दलाल आणि स्पा मॅनेजर असे नेटवर्क उभे करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही तो परिसरातील कोणाच्याही लक्षात आला नसल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी अचानक धाड टाकल्यानंतर स्पामध्ये काम करणाऱ्या २५ ते ३० वयोगटातील सहा तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी सुधारगृहात पाठवण्यात आले. दादरसारख्या गजबजलेल्या आणि संवेदनशील परिसरात स्पाच्या नावाखाली अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता, या कथित रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या नेटवर्कचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा सखोल तपास शिवाजी पार्क पोलीस करत आहेत. तपासातून या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.