भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
मुंबई
mumbai vile parle fire मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एका निवासी इमारतीच्या ११व्या मजल्यावर भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. विलेपार्ले पश्चिमेकडील चर्च रोडवर सेंट झेवियर स्कूलजवळ असलेल्या शांता भवन इमारतीत रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे डझनभर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले. सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत अडीच वर्षांच्या अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांचा मृत्यू झाला.
 

mumbai vile parle fire 
आगीच्या वेळी ११व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सहा जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली. त्यामध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश होता. सर्वांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर अबीर आणि अंकिता यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नानावटी रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. मुग्धा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत सहा जण जखमी झाल्याची माहिती रुग्णालयाला मिळाली होती. त्यापैकी दोघांना रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. मृतांमध्ये अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांचा समावेश आहे. जखमी पार्थ (३२), हिरेन (६४), यशस्वी आणि अभिषेक यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई अग्निशमन दलाने सुरुवातीला रात्री १० वाजता आगीला ‘लेव्हल-१’ म्हणजेच किरकोळ स्वरूपाची आग म्हणून वर्गीकृत केले होते. मात्र, अवघ्या १६ मिनिटांनी, रात्री १० वाजून १६ मिनिटांनी आगीची तीव्रता वाढल्याने तिला ‘लेव्हल-२’ म्हणजे मध्यम स्वरूपाची आग घोषित करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल करण्यात आली.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलासोबत पोलीस, परिसरातील वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी, रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आग आटोक्यात आणल्यानंतरही उशिरापर्यंत कूलिंग ऑपरेशन सुरू होते.
दरम्यान, मुंबईत यापूर्वीही लिफ्टमध्ये फुग्यांचा स्फोट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ४ फेब्रुवारी रोजी गोरेगावमधील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये फुगे घेऊन एक व्यक्ती शिरल्यानंतर अचानक फुग्यांचा स्फोट झाला आणि आग लागली होती. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.