नवी दिल्ली
n chandrasekaran भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि अग्रगण्य औद्योगिक समूह असलेल्या टाटा समूहाच्या सर्वोच्च नेतृत्वात मोठा बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या सध्याच्या कार्यकाळाची मुदत संपेपर्यंत, म्हणजे फेब्रुवारी २०२७पर्यंत, ते पदावर कायम राहणार आहेत. त्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी स्वतःला उपलब्ध करून न देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या घडामोडीमुळे टाटा समूहाचा पुढील उत्तराधिकारी कोण असेल, याबाबत भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
एन. चंद्रशेखरन यांनी जानेवारी २०१७मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्याआधी त्यांनी समूहातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या जवळपास दशकभराच्या नेतृत्वकाळात टाटा समूहाने पारंपरिक व्यवसायांसोबतच नव्या आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी निर्मिती, विमानसेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि संरक्षण उत्पादन यांसारख्या क्षेत्रांत समूहाने मोठ्या गुंतवणुकीची पावले उचलली. विशेषतः एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे आणणे हा त्यांच्या कार्यकाळातील ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय मानला जातो.द्रशेखरन यांच्या राजीनाम्याची घोषणा टाटा सन्सच्या १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) काही दिवस आधी झाली आहे. या बैठकीत संचालक मंडळातील सदस्य म्हणून त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या प्रस्तावावर चर्चा होणार होती. टाटा सन्सच्या व्यवस्थेनुसार अध्यक्षपद हे संचालक मंडळाच्या सदस्यत्वाशी संबंधित असल्याने ही बैठक त्यांच्या पुढील कार्यकाळाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. मात्र, त्याआधीच चंद्रशेखरन यांनी पुढील कार्यकाळासाठी स्वतःला उपलब्ध करून न देण्याचा निर्णय जाहीर केला. आता समूहाच्या पुढील नेतृत्वासाठी उत्तराधिकारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळाच्या विस्तारावरून टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यातील मतभेदांची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये सुमारे ६६ टक्के हिस्सा आहे. समूहातील नव्या व्यवसायांमध्ये होणारी मोठी गुंतवणूक, भांडवलाची गरज, तोट्यातील काही व्यवसायांचे भवितव्य, तसेच समूहाची भविष्यातील दिशा आणि प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंच्या भूमिकांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त यापूर्वी समोर आले होते. फेब्रुवारी २०२६मध्ये चंद्रशेखरन यांच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळाबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर आला होता; मात्र त्यावर एकमत न झाल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
चंद्रशेखरन यांनी आपल्या निर्णयामागे नेतृत्वातील स्पष्टता आणि समूहाच्या भविष्यातील सातत्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या सध्याच्या कार्यकाळाची मुदत २० फेब्रुवारी २०२७ रोजी संपणार आहे. समूहातील अनेक महत्त्वाचे धोरणात्मक प्रकल्प निर्णायक टप्प्यावर असल्याने फेब्रुवारी २०२७नंतरचे नेतृत्व लवकर निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी संचालक मंडळाला कळवले आहे. त्यामुळे उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया आता टाटा समूहासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली टाटा सन्सची आर्थिक स्थितीही अधिक मजबूत झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा २१.८ टक्क्यांनी वाढून ३१,९६१ कोटी रुपयांवर पोहोचला, तर एकूण महसूल ९.१ टक्क्यांनी वाढून ४२,३६६.५५ कोटी रुपयांवर गेला. एअर इंडियासारख्या उपक्रमांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे सुरुवातीच्या काळात तोटा वाढला असला, तरी समूहाच्या भविष्यातील विस्तारासाठी ही दीर्घकालीन धोरणात्मक पावले आवश्यक असल्याचे चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केले होते.
आता १८ ऑगस्टची टाटा सन्सची एजीएम आणि त्यानंतर होणारी उत्तराधिकारी निवड याकडे कॉर्पोरेट क्षेत्राचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी २०२७मध्ये चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर टाटा समूहाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार, हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने पारंपरिक उद्योगांपासून तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, विमानसेवा आणि संरक्षणासारख्या नव्या क्षेत्रांपर्यंत केलेल्या विस्तारानंतर पुढील अध्यक्षासमोर हीच विकासाची दिशा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.