तेलंगणातील एमडी ड्रग्जच्या कारखान्याचे ‘नागपूर कनेक्शन’

५४ कोटींची २७ किलो मेफेड्रोन जप्त; मास्टरमाइंड निघाला नागपूरचा

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
md drug factory in telangana नागपूर आणि विदर्भात एमडी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या आंतरराज्यीय नेटवर्कचा तेलंगणा पोलिसांच्या कारवाईत पर्दाफाश झाला आहे. यदाद्री-भुवनगिरी जिल्ह्यात पोलिसांनी एका एसयूव्हीमधून तब्बल २७ किलो मेफेड्रोन (एमडी) आणि ४० किलो ॲसीटोन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या एमडीची किंमत सुमारे ५४ कोटी रुपये आहे. या प्रकरणात नागपूरचा चेतन मधुकर मेश्राम हा मुख्य सूत्रधार आणि आर्थिक मदत करणारा असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचा साथीदार आकाश अशोक गावंडे (३१) यालाही अटक करण्यात आली आहे.
 
 
md drug factory in telangana
 
हैदराबादजवळील कोंडामडुगू परिसरात एका गुप्त ठिकाणी एमडी तयार करण्याची अवैध प्रयोगशाळा सुरू होती. येथे तयार होणारी ड्रग्जची खेप महाराष्ट्रात, विशेषतः नागपूर आणि विदर्भात पाठविण्याची तयारी सुरू होती. नागपूरचा आरोपी तेलंगणात जाऊन एमडी निर्मिती आणि तस्करीचे नेटवर्क चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोंडामडुगू परिसरात एका एसयूव्हीला अडवून पोलिसांनी झडती घेतली. वाहनातून २७ किलो एमडी आणि ४० किलो ॲसिटोन जप्त करण्यात आले.
 
गुप्त प्रयोगशाळेत तयार होते एमडी
कोंडामडुगू येथील गुप्त प्रयोगशाळेत एमडी तयार करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी प्रयोगशाळेवर छापा टाकून रिॲक्टर, सेंट्रीफ्यूजसह ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे जप्त केली. त्यामुळे हे नेटवर्क केवळ ड्रग्ज तस्करीपुरते मर्यादित नसून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज निर्मिती करीत असल्याचे स्पष्ट झाले. चेतन मेश्राम हा या संपूर्ण नेटवर्कचा मुख्य संचालक आणि फायनान्सर होता. त्याचा साथीदार आकाश गावंडे याचीही ड्रग्जच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. दोघांच्या अटकेनंतर पोलिसांकडून नेटवर्कमधील इतर व्यक्ती तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणात गोपाल सिरपत पटले आणि चंदा प्रदीप ठाकूर यांचा शोध सुरू आहे. ड्रग्जच्या पुरवठा साखळीत दोघांची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे. याशिवाय आसामचा मुजम्मल हक आणि हैदराबादचा यू.आर. मूर्ती यांनाही अटक करण्यात आली आहे.
 
विदर्भातील कोणत्या शहरात होणार होती विक्री?
जप्त करण्यात आलेली २७ किलो एमडी नागपूर आणि विदर्भातील नेमक्या कोणत्या शहरांमध्ये पोहोचविण्यात येणार होती, याचा तपास पोलिस करीत आहेत. आरोपींच्या चौकशीतून संभाव्य खरेदीदार, ड्रग्जच्या पुरवठ्याची साखळी आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कारवाईमुळे विदर्भातील एमडी पुरवठ्यामागे सक्रिय आंतरराज्यीय ड्रग्ज नेटवर्क असल्याची शक्यता बळावली आहे.