मानोरा,
Parvati Bai Rathod मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील असून सध्या नागपूर येथे स्थायिक झालेल्या पार्वती बाई राठोड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेचा वसा घेतला आहे. त्यांच्या या निस्वार्थी सेवेचा लाभ मानोरा तालुक्यातील अनेक गावांतील गरीब व गरजू नागरिकांना होत आहे.
नागपूर सारख्या मोठ्या शहरात उपचारासाठी जाणार्या ग्रामीण रुग्णांना डॉक्टर, हॉस्पिटल, औषधे आणि आर्थिक मदत या सर्व गोष्टींमध्ये पार्वती बाई स्वतः पुढाकार घेऊन मदत करतात. त्यामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.वैद्यकीय मार्गदर्शन, कॅन्सर, हृदयरोग, किडनी, अपघातग्रस्त अशा गंभीर आजारांसाठी नागपूरमधील कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणता डॉक्टर चांगला आहे, याची संपूर्ण माहिती त्या रुग्णांना देतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, संजय गांधी निराधार योजना, महात्मा फुले आरोग्य योजना यांसारख्या शासकीय योजनांचे फॉर्म भरणे व मंजुरीसाठी पाठपुरावा त्या स्वतः करतात. आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी देणगीदारांशी संपर्क साधून मदतही मिळवून देतात. उपचारादरम्यान रुग्ण व नातेवाईकांना धीर देण्याचे कामही त्या करतात.
तालुक्यासाठी आधारवड
मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील उमेश ढोके, चेतन जाधव, अवनी राठोड सोयजना, गजानन राठोड फुलऊमरी, कृष्णा पवार सोमनाथ नगर सोमठाणा, शितल जाधव आसोला, सुरेश इंगळे, अश्विनी चव्हाण मानोरा, विजय राठोड उमरी यांसह अनेक गावातील रुग्णांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे वेळेत उपचार मिळाले आहेत. एका महिलेने घरातून बाहेर पडून समाजसेवा करत अनेकांचे जीव वाचवण्याचे काम केले आहे. पार्वतीबाई राठोड यांच्या या कार्यामुळे नागपूरकर पार्वती बाई हे नाव आज मानोरा तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या तोंडी आहे. पैशापेक्षा माणुसकी मोठी असते, याचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून येतो.