नीट-पीजी उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या चुकीच्या शहरांची माहिती

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
पुणे,
neet pg नीट परीक्षा आणि गोंधळ हे समीकरण बनले असून नीट-पीजी २०२६ च्या काही उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या चुकीच्या शहरांची माहिती एसएमएसद्वारे मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने स्पष्टीकरण दिले आहे. बोर्डाने म्हटले की, तांत्रिक कारणांमुळे काही उमेदवारांना अनवधानाने चुकीच्या परीक्षा केंद्र शहराची माहिती एसएमएसद्वारे पाठवली गेली. त्यानंतर योग्य शहर दर्शवणारे एसएमएस आणि ई-मेल पाठवण्यात आले आहेत.
 

neet pg 2026 exam centre city error: candidates receive wrong sms, nbems issues clarification 
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणारी नीट-पीजी २०२६ परीक्षा ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. बोर्डाने उमेदवारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, नीट-पीजी २०२६ अर्जदारांना परीक्षा केंद्रांच्या शहराचे वाटप नियोजित वेळापत्रकानुसार एनबीईएमएसच्या संकेतस्थळाद्वारे कळवण्यात आले आहे. काही तांत्रिक गडबडीमुळे काही उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवण्यात आलेले शहर चुकीचे होते. त्यानंतर योग्य वाटप केलेले शहर दर्शवणारे एसएमएस आणि ई-मेल पाठवण्यात आले आहेत, असे बोर्डाने स्पष्ट केले. योग्य परीक्षा केंद्रांच्या ठिकाणांचा तपशील एनबीईएमएसच्या संकेतस्थळावरील सर्व उमेदवारांच्या अर्जदार पोर्टलवर उपलब्ध आहे, असे बोर्डाने सांगितले. उमेदवारांनी त्यांना वाटप करण्यात आलेल्या परीक्षा केंद्र शहराबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा आधार घ्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. पूर्वी मिळालेल्या एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवर जाऊन माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बोर्डाने उमेदवारांना सावधगिरीचा इशाराही दिला आहे. नेहमी एनबीईएमएसकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि बनावट संकेतस्थळे तसेच चुकीच्या माहितीपासून सावध राहा, असे बोर्डाने म्हटले आहे.