बिहार
patna firing बिहारची राजधानी पाटणा येथे गुन्हेगारांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रामकृष्ण नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भूपतिपूर ज्योतिष बाबा रोड परिसरात मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी एका तरुणावर भररस्त्यात गोळीबार केला. या गोळीबारात शुभम यादव हा तरुण गंभीर जखमी झाला असून, संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपाचे दुचाकीवरून तीन सशस्त्र हल्लेखोर परिसरात आले होते. रस्त्यावर शुभम यादव समोर येताच त्यांनी त्याला लक्ष्य केले आणि अचानक गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी तरुणावर सलग गोळ्या झाडल्यानंतर दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
शुभम यादव हा प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. गोळी लागल्यानंतर तो रस्त्यावर कोसळला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
गोळीबाराची संपूर्ण घटना patna firing जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपी घटनास्थळी कोणत्या मार्गाने आले आणि गोळीबार केल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाले, याचाही तपास केला जात आहे. यासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे.गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आपापसातील वाद, जुने वैर तसेच अन्य संभाव्य कारणांचा तपास केला जात आहे. जखमी शुभम यादव याचा जबाब आणि घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. आरोपींच्या संभाव्य ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.दरम्यान, या घटनेची वेळही चर्चेचा विषय ठरली आहे. रामकृष्ण नगर परिसरात तरुणावर गोळीबार झाला, त्याच वेळी पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे आढावा बैठक सुरू होती. राजधानीत पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच भररस्त्यात झालेल्या गोळीबारामुळे पाटण्यात गुन्हेगारांचे मनोबल वाढले असल्याचा आरोप होत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीसह गुन्हेगारी नियंत्रणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.