वर्दीतला कर्मचारीच ड्रग्जच्या व्यवहारात!

४ ग्रॅम एमडीसह कॉन्स्टेबल जाळ्यात

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Police involved in drug trade मुंबई पोलीस दलाला हादरवून सोडणारी घटना मालवणी परिसरात समोर आली आहे. अमली पदार्थांच्या व्यवहारावर कारवाई करण्यासाठी असलेल्या यंत्रणेतीलच एका पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. किरण इंदुलकर असे अटक करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलचे नाव असून तो सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी त्याची मालवणी पोलीस ठाण्यात नियुक्ती होती.मालवणी पोलिसांना गेट क्रमांक ८ जवळ अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. कारवाईसाठी एका पोलिसाला अमली पदार्थ विक्रेता म्हणून उभे करण्यात आले. याचदरम्यान किरण इंदुलकर तेथे पोहोचला आणि त्याने १५ हजार रुपयांना ४ ग्रॅम एमडी खरेदी केली. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. त्यानंतर त्याची ओळख समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
 
 
 

Police involved in drug trade 
किरण इंदुलकर हा बीडीडी नायगाव परिसरातील रहिवासी आहे. मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्याचा परिसरातील अमली पदार्थांच्या नेटवर्कशी संपर्क आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्याची माहिती आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला ताकीद देऊन बदली करण्यात आली होती, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.सध्याच्या प्रकरणात पोलिसांनी इंदुलकरला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अमली पदार्थांच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. पोलीस दलातीलच कर्मचारी अमली पदार्थांच्या खरेदीत अडकल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि दलाच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.