मुंबई,
Rickshaw drivers in a scramble in Mumbai महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आल्यानंतर आता त्यांची मराठीची परीक्षा घेतली जात आहे. अशाच एका परीक्षेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हिंदी भाषिक रिक्षाचालक मराठीतील प्रश्नांना तोडक्या-मोडक्या भाषेत उत्तर देताना दिसत आहेत. परीक्षेतील काही मजेशीर प्रसंगांमुळे या व्हिडीओने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘शर्मा’ आणि ‘वर्मा’ अशी हिंदी आडनावे असलेले काही रिक्षाचालक मराठीची परीक्षा देताना दिसतात. शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. परीक्षकांकडून मराठीत प्रश्न विचारल्यानंतर काही चालक त्यांना जमेल त्या पद्धतीने उत्तर देताना दिसतात.

परिवहन विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यवहारात उपयोगी पडणारे मराठीचे ज्ञान आवश्यक केले आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. यासाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण वर्गही घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता चालकांची मराठीची परीक्षा घेतली जात आहे. ‘तुमचं पूर्ण नाव सांगा’, ‘तुम्ही कुठून आलात?’ तसेच ‘तुम्ही माझ्या रिक्षात बसा’ हे वाक्य समोरच्या व्यक्तीला मराठीत कसे सांगाल, असे प्रश्न विचारले जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे चालक देत असले तरी काही मराठी शब्द आणि वाक्यरचनेबाबत त्यांचा गोंधळ होताना दिसतो. त्यामुळे या परीक्षेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रवाशांशी संवाद साधताना अडचण येऊ नये, हा व्यवहारिक मराठीच्या अटीमागील मुख्य उद्देश आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. नियमांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार रिक्षा, टॅक्सी, इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप-आधारित मोटार कॅब तसेच संबंधित चालक आणि परमिटधारकांसाठी मराठीच्या कार्यकारी ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्यास चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.