उद्यापासून श्रावण...चार सोमवार, चार शिवामूठ अन् सणांची पर्वणी

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
Shravan starts tomorrow हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा श्रावण मास यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानल्या जाणाऱ्या या महिन्यात देशभरातील शिवभक्तांकडून पूजा, उपवास, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी केले जातात. पावसाळ्याच्या काळात निसर्ग हिरवाईने नटलेला असताना सुरू होणाऱ्या या महिन्याला अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानले जाते.वैदिक पंचांगानुसार यंदाचा श्रावण मास 13 ऑगस्टपासून सुरू होऊन 11 सप्टेंबर 2026 रोजी समाप्त होईल. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा भगवान महादेवाला अत्यंत प्रिय असलेला महिना मानला जातो. त्यामुळे या काळात शिवभक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असते.
 
 

d435546 
भगवान शिवाला समर्पित महिना
श्रावण महिन्यात येणारे सोमवार भगवान शिवाला समर्पित मानले जातात. या दिवशी उपवास करून शिवलिंगावर जल अर्पण करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाची मनोभावे पूजा केल्यास त्यांची कृपा प्राप्त होते आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारच्या दिवशी मंदिरांमध्ये दर्शन, अभिषेक आणि पूजेसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते.यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी, दुसरा 24 ऑगस्ट रोजी, तिसरा 31 ऑगस्ट रोजी, तर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी असेल.
 
 
 
शिवामूठ कोणती?
महाराष्ट्रातील प्रचलित धार्मिक परंपरेनुसार श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर विशिष्ट धान्याची एक मूठ अर्पण केली जाते. या परंपरेला ‘शिवामूठ’ किंवा ‘शिवमुष्टीव्रत’ असे म्हटले जाते. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ अर्पण केली जाते. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी गहू अर्पण करण्याची परंपरा आहे. या माध्यमातून भाविक भगवान शिवाची भक्तिभावाने आराधना करतात.
 
 
 

विविध धार्मिक परंपरा, व्रत-वैकल्ये आणि सण
श्रावण महिन्यात धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे अनेक सण आणि व्रत येतात. श्रावणी सोमवारसोबत नागपंचमी, पुत्रदा एकादशी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि श्रावणी पौर्णिमा हे प्रमुख सण या काळात साजरे केले जातात. काही पंचांगांनुसार गोकुळाष्टमीचा समावेश भाद्रपद महिन्यात होतो. त्यामुळे श्रावण मास हा केवळ भगवान शिवाच्या उपासनेपुरता मर्यादित न राहता विविध धार्मिक परंपरा, व्रत-वैकल्ये आणि सणांनी समृद्ध असलेला महिना ठरतो. 13 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, शिवभक्तांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.