जिल्हा परिषद शाळेच्या स्लॅबचा थर कोसळला; १३ विद्यार्थी जखमी

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
सोलापूर
solapur school महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मध्य महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. अशातच अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावातून धक्कादायक घटना समोर आली असून, जिल्हा परिषद शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा थर अचानक कोसळल्याने १३ विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

solapur school slab collapse: 13 students injured in akkalkot 
बबलाद गावातील सोलापूर जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. संबंधित शाळेची इमारत सुमारे २५ वर्षे जुनी आहे. काल दुपारी शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा काही भाग अचानक खाली कोसळला. त्यावेळी स्लॅबचा भाग थेट खाली असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने तब्बल १३ विद्यार्थी जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसून, सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.शाळेची इमारत अत्यंत जुनी झाल्यामुळेच स्लॅबचा थर कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी शाळेची नवीन इमारत तातडीने उभारण्याची मागणी पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जुन्या शालेय इमारतींची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी तातडीने करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.