मुंबई,
Tata Sons' Chandrasekaran resigns टाटा समूहाच्या सर्वोच्च स्तरावर मोठा बदल झाला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा तत्काळ लागू होणार नसून सध्याचा कार्यकाळ पूर्ण करून ते फेब्रुवारी २०२७ मध्ये पद सोडणार आहेत. या घडामोडीमुळे टाटा समूहातील नेतृत्वबदलाची प्रक्रिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे.चंद्रशेखरन यांनी २०१७ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यापूर्वी त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले होते. ते १९८७ मध्ये टाटा समूहात दाखल झाले होते. सध्याचा त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे आणि त्यांनी पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्तीचा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय यावर्षी फेब्रुवारीमध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने पुढे ढकलला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील कार्यकाळाबाबत टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट्समध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले होते. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी काही अटी आणि समूहातील कंपन्यांच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याची घोषणा १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या टाटा सन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या काही दिवस आधी झाली आहे. त्यांच्या पुढील नियुक्तीबाबतचा निर्णय या सभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात होता.
दरम्यान, चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर टाटा समूहातील काही कंपन्यांच्या समभागांमध्येही घसरण झाली. बुधवारी टाटा समूहातील समभागांमध्ये काही ठिकाणी ४ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चंद्रशेखरन यांच्या निर्णयाचा बाजारावरही तातडीचा परिणाम दिसून आला. टाटा सन्सच्या नेतृत्वाची पुढील धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे आता उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी २०२७ पर्यंत चंद्रशेखरन पदावर कायम राहणार असल्याने नेतृत्वबदलाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे.