तेलंगणा
telangana sangareddy road accident तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा भीषण रस्ते अपघात झाला. सतवारजवळ भरधाव टँकरने ऑटोला जोरदार धडक दिल्याने पाच महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी होती की ऑटो रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये एकूण १२ जण प्रवास करत होते. हे सर्व जण कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील शेतमजूर होते. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. जखमींना रुग्णालयात सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांच्या उपचारात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होऊ नये, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये बहुतांश महिला होत्या. मृतांची ओळख कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील राजगेरा गावातील रहिवासी म्हणून पटली आहे. मृतांमध्ये रेखा, श्रीदेवी, कविता, रेशमा, निकिता आणि ऑटोचालक देवदास यांचा समावेश आहे. तर निर्मला, तुलजम्मा, चंद्रकला, राधिका, शिल्पा आणि शोभा हे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
अपघात नेमका कोणत्या telangana sangareddy road accident कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.दरम्यान, मंगळवारी रात्रीच संगारेड्डी जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात झाला. कोहिर मंडलातील कावेली येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर एका कारने रस्त्यावरील दुभाजकाला धडक दिली. त्यानंतर ही कार समोरून येणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात किमान चार वाहनांचे नुकसान झाले.