अनिल कांबळे
नागपूर,
threat to kill girlfriend दुसऱ्या तरुणीशी लग्न केल्यानंतर बोलणे बंद केल्याच्या रागातून २६ वर्षीय तरुणाने आपल्या २२ वर्षीय प्रेयसीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याचा आणि चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ही घटना एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी पीडित २२ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हिंगणा तालुक्यातील वाघुमरी येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मूळची नागपूर जिल्ह्यातील असलेली पीडिता सध्या एमआयडीसी परिसरात राहते. तक्रारीनुसार, आरोपी हा पीडितेच्या मामेभाऊ असून दोघांची ओळख होती. त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी सोबत बराच वेळ घालवला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, काही नातेवाईकांच्या विरोधामुळे त्या दोघांनी लग्न केले नाही. दरम्यान, आरोपीने यावर्षी मे महिन्यात दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. मात्र, लग्न झाल्यानंतरही आरोपी हा त्या तरुणीला वारंवार संबंध ठेवण्यासाठी बाध्य करीत होता. तसेच त्याने अनेकदा तिचा पाठलाग केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. १० ऑगस्ट रोजी पीडिता झोपलेली असताना आरोपी तिच्या खोलीत शिरला. माझ्याशी बोलणे का बंद केले?, अशी विचारणा केली. त्यानंतर शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपीने गैरवर्तनाच्या उद्देशाने तिचा हात पकडला आणि तिचे कपडे फाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील मारहाण, विनयभंग, अनधिकृत प्रवेश आणि जीवे मारण्याची धमकी यासंबंधीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.