जीवाला धोका असल्याने तुर्कीमध्ये बदलले विमान!

ट्रम्प यांचा मोठा खुलासा

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's major revelation अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीतील नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेदरम्यान आपले विमान बदलण्यात आल्याची माहिती स्वतः दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण दुसऱ्या विमानातून प्रवास केल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. आपल्याला धमकी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्याबाबत अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्यांनी म्हटले.या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी विमान बदलल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तुर्की दौऱ्यादरम्यान कतारकडून देण्यात आलेल्या बोईंग ७४७-८ विमानातून त्यांनी जुन्या एअर फोर्स वनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना गुप्तपणे लहान सी-३२ए विमानात हलवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.
 
 

Trump 
 
गेल्या महिन्यात इराणकडून मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवरही ट्रम्प यांच्या विमानप्रवासात बदल करण्यात आल्याचे वृत्त होते. वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, ट्रम्प यांना जुन्या एअर फोर्स वनमधून केटरिंग कंटेनरच्या माध्यमातून सी-३२ए विमानात गुप्तपणे नेण्यात आले होते. त्या वेळी व्हाईट हाऊस किंवा ट्रम्प यांच्याकडून विमान बदलण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. ओहायोहून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. सिक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी वेगळ्या विमानातून प्रवास करण्यास सांगितले आणि आपण त्यांच्या सूचनांचे पालन केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला धमकी असल्याचे वाटत होते, मात्र त्याबाबत आपण अधिक चौकशी केली नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी आपल्या सुरक्षेबाबत येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करताना, अशा अनेक धमक्यांची माहिती सामान्य जनतेला नसते, असा दावा केला. महत्त्वाच्या राष्ट्राध्यक्षांना अनेक प्रकारच्या धमक्यांना सामोरे जावे लागते, असे सांगतानाच आपण कदाचित सर्वात महत्त्वाचा राष्ट्राध्यक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले.