“प्रेम, निष्ठा आणि वेळ…” म्हणत दिला अप्रत्यक्ष टोला?

मोहसिन अख्तरच्या दुसऱ्या लग्नानंतर उर्मिलाची ‘क्रिप्टिक’ पोस्ट

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
मुंबई

urmila matondkar अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तरने नुकतंच दुसरं लग्न केलं आहे. निधा भट्टसोबत निकाह केल्यानंतर मोहसिनने लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंसोबत त्याने पत्नी निधासाठी लिहिलेला रोमँटिक संदेशही चर्चेत आला आहे. निधा ही केवळ आपली पत्नी नसून आपलं घर आणि शांती असल्याचं म्हणत मोहसिनने तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं. एकीकडे मोहसिनची ही पोस्ट चर्चेत असतानाच उर्मिला मातोंडकरने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेम, निष्ठा आणि वेळ या गोष्टींच्या मूल्याबद्दल असलेल्या या पोस्टमुळे उर्मिलाने ‘क्रिप्टिक’ पोस्टद्वारे पूर्व पती मोहसिनला अप्रत्यक्ष टोला लगावला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
 

urmila matondkar ex-husband mohsin akhtar remarries, actress shares cryptic post 
मोहसिनने यावर्षी जूनमध्ये पहिल्यांदा त्याच्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली होती. आयुष्यात पुन्हा प्रेम मिळाल्याबद्दल आणि निधासोबत एका नव्या अध्यायाची सुरुवात करत असल्याबद्दल त्याने त्यावेळी भावनिक संदेश शेअर केला होता. आता लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो पोस्ट करत त्याने पत्नी निधासाठी लिहिले, ‘तू माझी फक्त पत्नी झाली नाहीस, तर तू माझं घर, माझी शांती आणि माझ्या प्रत्येक दिवसाचा आवडता भाग बनली आहेस. तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी अल्लाहचा आभारी आहे. मी वचन देतो की आपल्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझा आदर करेन, तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि तुझ्यावर प्रेम करेन.’
मोहसिनच्या या पोस्टनंतर उर्मिला मातोंडकरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक संदेश शेअर केला. ‘मला प्रेम, निष्ठा आणि वेळ यांसारख्या मौल्यवान गोष्टी आवडतात,’ असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. उर्मिलाने ही पोस्ट कोणाला उद्देशून केली आहे, याचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, मोहसिनच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट आणि उर्मिलाची स्टोरी जवळपास एकाच वेळी चर्चेत आल्याने नेटकऱ्यांनी या दोन्ही गोष्टींचा संबंध जोडला आहे. त्यामुळे उर्मिलाने या पोस्टमधून मोहसिनला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
उर्मिला मातोंडकर आणि काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तर यांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका खासगी समारंभात लग्न केले होते. आंतरधर्मीय विवाह आणि दोघांमधील दहा वर्षांच्या वयातील फरकामुळे त्यावेळी हे लग्न चर्चेत आले होते. २०१४ मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी विवाह केला. मात्र, लग्नाच्या आठ वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि २०२४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.
घटस्फोटानंतर दोन वर्षांनी मोहसिनने निधा भट्टसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या या नव्या आयुष्याच्या सुरुवातीच्या पोस्टसोबतच उर्मिलाची ‘प्रेम, निष्ठा आणि वेळ’ याबाबतची पोस्ट चर्चेत आल्याने त्यांच्या नात्याबाबतच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.