वाशीम,
Rain पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या वरुणराजाने ११ व १२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वदूर काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. रात्रभर पडलेल्या पावसाने नदी, नाले वाहू लागले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली. १२ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यातील १८.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा उशिराने पेरण्या झाल्या. मात्र, अधुनमधून पाऊस पडत असल्याने पिके चांगलीच बहरली. मागील आठवडा भरापासून पावसाने पुन्हा उघाड दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून परिसरात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने तूर सोयाबीन, कपाशी, हळद पिके चांगलीच बहरली आहे. रिमझिम पावसामुळे पिके तरली असली तरी सिंचन प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडले उलटले असून, पावसाळ्याचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप मोठ्या स्वरुपातील पाऊस न झाल्याने धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पातील पाण्यासाठ्यातही अपेक्षीत वाढ झाली नाही. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प अजूनही नीचांकी पातळीवर आहे.
१२ ऑगस्ट रोजी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात १८.०८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक वाशीम तालुक्यात ३७ मि.मी. पाऊस पडला. रिसोड तालुका ३४.०९ मि.मी., मालेगाव तालुका २३.०४ मि.मी, मंगरुळनाथ तालुका ७.०२ मि.मी., मानोरा तालुका १.०५ तर कारंजा तालुक्यात ०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. १२ ऑगस्ट ला जिल्ह्यात १८.०८ मि. मी. पावसाची नोंद झाली. दोन दिवसापासून ढगाळ वातावरण कायम असून, शेतकर्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.