नवी दिल्ली,
will the bangladesh tour be cancelled भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने भारतीय संघाच्या नियोजित बांगलादेश दौऱ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भारत-बांगलादेश मालिकेसाठी अपेक्षित असलेल्या कालावधीतच भारत-अफगाणिस्तान मालिका होणार असल्याने बांगलादेश दौरा होण्याची शक्यता आणखी कमी झाल्याचे दिसत आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबर रोजी होणार असून दुसरा सामना १५ सप्टेंबरला खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होईल. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान या मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. अफगाणिस्तानला त्यांच्या घरच्या मालिकेसाठी भारतात सामने आयोजित करण्याची संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा बांगलादेश दौरा सप्टेंबरमध्ये प्रस्तावित होता. या दौऱ्यात सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर तीन टी-२० सामने खेळवले जाण्याची शक्यता होती. ही मालिका १ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत होण्याची चर्चा होती. मात्र, आता १३ सप्टेंबरपासून भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेला सुरुवात होणार असल्याने बांगलादेश दौऱ्याचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.
भारत-बांगलादेश मालिकेबाबत अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नसली तरी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून दौरा निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नव्या वेळापत्रकामुळे हा दौरा पुन्हा पुढे ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मालिका यापूर्वीही पुढे ढकलण्यात आली होती.
भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेट संबंधांमध्ये अलीकडच्या काळात तणाव निर्माण झाला आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमधील संबंधांवर परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रयत्न करण्यात आले, मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका कायम ठेवली. त्यानंतर बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून बाहेर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता भारताच्या बांगलादेश दौऱ्याबाबतही अनिश्चितता कायम आहे.
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेचे वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे भारतीय संघाच्या आगामी कार्यक्रमाला आता स्पष्टता आली आहे. मात्र, बांगलादेशविरुद्धची सहा सामन्यांची मालिका कधी होणार, याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे. भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेतील सामने १३ सप्टेंबर, १५ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवले जाणार आहेत.