अनिल कांबळे
नागपूर,
womans private videos go viral मोबाईल दुरुस्तीसाठी दिलेल्या फोनमधील महिलेचे पतीसोबत असेलले अंतरंग संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ मित्रांच्या मोबाईलवर पाठवून व्हायरल केले. या प्रकरणी ग्राहक असलेल्या महिलेच्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपीने खासगी फोटो- व्हिडिओ कॉपी करून आणखी कुठे पाठवले का?, याचाही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
सनी सिंग (२६), रा. रामनगर, अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून १० ऑगस्ट रोजी एमआयडीसी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला कॅटरिंग क्षेत्रात काम करते. लग्नापूर्वी ती मॉडेल म्हणूनही काम करीत होती. तिच्याकडे ओप्पो कंपनीचा मोबाईल असून त्यामध्ये तिचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ होते. मोबाईलची टचस्क्रीन व्यवस्थित काम करीत नसल्याने तिने तो हिंगणा रोडवरील ‘द हब’ मोबाईल शॉपी येथे दुरुस्तीसाठी दिला होता. आरोपी सनी सिंग हा मोबाईल दुरुस्तीचे काम पाहत होता. त्याने महिलेच्या मोबाईलचा स्क्रीन लॉक पॅटर्न विचारून घेतला.
तसेच दुरुस्ती होईपर्यंत वापरण्यासाठी तिला जुना मोबाईल दिला आणि तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवला. दरम्यान, महिलेचा तात्पुरता मोबाईल हरवला. काही दिवसांनंतर दुकानातील एका कर्मचाऱ्यासह इतरांकडून महिलेला तिच्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ आरोपीने पाहिल्याची माहिती मिळाली. यामध्ये तिचे तसेच तिच्या पतीचे वैयक्तिक आणि अश्लील स्वरूपाचे फोटो-व्हिडिओ असल्याचे समोर आले. आरोपीने हे फोटो-व्हिडिओ दुकानातील इतर कर्मचाऱ्यांना दाखविल्याचा आरोप आहे. महिलेने याबाबत सनी सिंगला जाब विचारला असता त्याने तिला अश्लील शिवीगाळ करून पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीनंतर हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.