चोरीचा आरोप केल्यामुळे युवकाची आत्महत्या

    दिनांक :12-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
youth commits suicide भांडेवाडी परिसरात राहणाऱ्या एका युवकावर शेजाऱ्याने चोरीचा आळ घेतल्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. हनी तन्सराम निर्मलकर, रा. गिरिजानगर, भांडेवाडी, असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हनी हा घरी होता. त्यावेळी वस्तीत राहणाऱ्या राहुल आणि आनंद यांच्यात वाद सुरू होता. वादाचा आवाज ऐकून हनी आणि त्याची आई दोघेही त्यांना समजावण्यासाठी गेले.
 
 
youth commits suicide
 
यावेळी राहुलने हनीच्या आईला तिच्या मुलाने आपल्या खोलीत येऊन ३ हजार रुपये चोरल्याचा आरोप केला. राहुलच्या घरमालकानेही दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन या प्रकरणावर चर्चा करण्याचा सल्ला हनीला दिला. त्यानंतर हनी आणि त्याची आई घरी परतले. या घटनेमुळे हनी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. त्याने आपल्या आईला आपण गळफास घेणार असल्याचे सांगितले. मात्र, आईला त्याचे बोलणे गंमत म्हणून वाटले. त्यानंतर हनी आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. त्याने पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.