पावसाळी अधिवेशनात १२ विधेयकांना मंजुरी!

कामकाजावर विरोधकांच्या गोंधळाचा परिणाम

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
12 bills approved in Monsoon Session संसदेचे पावसाळी अधिवेशन लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर संपुष्टात आले. अधिवेशनाच्या अखेरीस केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी संसदेतील चर्चेत सहभागी होण्याऐवजी वारंवार गोंधळ आणि सभात्यागाचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.रिजिजू यांच्या मते, कायदे मंजूर करण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे ठरले असले तरी चर्चेच्या बाबतीत अपेक्षित कामकाज होऊ शकले नाही. अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण वेळेपैकी लोकसभेत केवळ १९ टक्के, तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज झाले. गोंधळ आणि वारंवार होणाऱ्या व्यत्ययांमुळे संसदेच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
d456
या अधिवेशनात एकूण १२ महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. मात्र, लोकसभेत मंजूर झालेल्या १२ विधेयकांपैकी ११ विधेयके विरोधकांच्या अनुपस्थितीत किंवा चर्चेविना मंजूर करण्याची वेळ आल्याचे रिजिजू यांनी सांगितले. केवळ सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायद्यावर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांत सविस्तर चर्चा झाली. परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे.रिजिजू यांनी सांगितले की, एनडीएचे सदस्य तसेच काही विरोधी खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला. मात्र, प्रमुख विरोधी पक्षांकडून वारंवार व्यत्यय आणण्यात आला आणि सभात्याग करण्यात आला. राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने संबंधित चर्चेतून सभात्याग केला असला, तरी इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
आपल्या दीर्घ संसदीय अनुभवाचा दाखला देत रिजिजू यांनी विरोधकांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्यतः विरोधी पक्ष सरकारला प्रश्न विचारतो आणि सरकारकडून त्याची उत्तरे अपेक्षित असतात. मात्र, यावेळी सरकारकडूनच चर्चेसाठी आग्रह केला जात असताना विरोधकांनी विविध कारणे देत चर्चेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली. संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले.काँग्रेसवर टीका करताना रिजिजू यांनी संसद परिसरात फलक घेऊन फिरणे आणि घोषणाबाजी करणे हेच काँग्रेसच्या खासदारांचे प्रमुख काम बनल्याचा आरोप केला. या वातावरणामुळे काँग्रेसच्या नव्या खासदारांनाही संसदीय कामकाज शिकण्याची आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. आगामी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या भूमिकेत सकारात्मक बदल होईल आणि संसदेतील चर्चेला अधिक महत्त्व दिले जाईल, अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली.