नवी दिल्ली,
action may be taken if rules are violated स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभरात तिरंग्याची सजावट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साह पाहायला मिळतो. घरांपासून कार्यालयांपर्यंत अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जातो. काही जण आपल्या वाहनांवरही तिरंगा लावून देशाप्रती प्रेम व्यक्त करतात. मात्र, वाहनावर राष्ट्रध्वज लावताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रध्वजाचा अवमान मानला जाऊ शकतो आणि कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.भारतात राष्ट्रध्वजाचा वापर ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया, २००२’नुसार नियंत्रित केला जातो. या नियमांमध्ये राष्ट्रध्वज कधी, कुठे आणि कोणत्या पद्धतीने फडकवायचा किंवा प्रदर्शित करायचा, याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आपल्या घरावर तसेच वैयक्तिक वाहनात तिरंगा ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, ध्वजाचा सन्मान आणि त्याची प्रतिष्ठा कायम राहील, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.

तिरंगा प्रदर्शित करताना केशरी पट्टी वरच्या बाजूला असणे आवश्यक आहे. ध्वज जमिनीला किंवा पाण्याला स्पर्श होणार नाही, तसेच तो फाटलेला, मळलेला किंवा खराब अवस्थेत नसावा. राष्ट्रध्वजाचा वापर सजावट, कपडे किंवा इतर व्यावसायिक कारणांसाठी करण्यास मनाई आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास ‘राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ अंतर्गत कारवाई होऊ शकते. या कायद्यात दंडासह तुरुंगवासाचीही तरतूद आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांबाबत विशेष नियम आहेत. सामान्य व्यक्ती आपल्या वाहनाच्या बाहेरील भागावर म्हणजेच बोनेट, छत, दरवाजा किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवू शकत नाही. वाहनाच्या आतील भागात, उदाहरणार्थ डॅशबोर्ड किंवा विंडस्क्रीनच्या आत, ध्वज सुरक्षित आणि सन्मानपूर्वक ठेवता येतो.
वाहनाच्या बाहेरील भागावर राष्ट्रध्वज फडकवण्याचा विशेषाधिकार सर्वसामान्य नागरिकांना नसून, भारतीय ध्वज संहिता २००२ मधील कलम ३.४४ नुसार काही विशिष्ट घटनात्मक आणि मंत्रिपदावरील व्यक्तींना हा अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री यांचा समावेश आहे.
वाहनांवर तिरंग्याचे स्टिकर लावण्याबाबतही नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गाडीच्या काचा, साइड मिरर किंवा बोनेटवर तिरंग्याचे स्टिकर लावले जातात. मात्र, असे स्टिकर उन्हामुळे किंवा पावसामुळे खराब होऊन फाटू शकतात किंवा मळू शकतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकवताना देशभक्तीसोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ध्वज वापरल्यानंतर तो रस्त्यावर, कचऱ्यात किंवा इतर अयोग्य ठिकाणी फेकला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे १५ ऑगस्टला वाहनावर तिरंगा लावताना नियमांची माहिती घेऊनच तो योग्य पद्धतीने प्रदर्शित करणे महत्त्वाचे ठरते.