भिरडे कुटुंबीयांचा मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
बुलढाणा,
bhirde familys शेगाव येथील रहिवासी दिवंगत छगन पांडुरंग भिरडे यांचे दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगातही सामाजिक बांधिलकी जपत मरणोत्तर नेत्रदानाचा प्रेरणादायी निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या संमतीनुसार जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथील नेत्रदान पथकाने आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून नेत्रसंकलन केले. या नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी प्राप्त होण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण होणार आहे.
 
bhirde familys
 
या नेत्रदान प्रक्रियेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, डॉ. अमोल उगले, डॉ. देशमुख, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट, ऑफ्थल्मिक ऑफिसर प्रवीण सोळंकी, सौरभ हिवाडे व विक्की जाधव यांच्यासह नेत्रदान पथकाने सहभाग घेतला. तसेच इंजि. घाटोड यांचे विशेष सहकार्य लाभले.
 
“नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे श्रेष्ठ दान आहे,” या भावनेतून भिरडे कुटुंबीयांनी घेतलेला निर्णय समाजासाठी आदर्श ठरला आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी निर्णयामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती वाढण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. दिवंगत छगन पांडुरंग भिरडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या या प्रेरणादायी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.