अनिल कांबळे,
नागपूर,
mehr-accident : भरधाव कार चालवून आपल्या दोन मित्राचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन कारचालकाच्या वडिलावर कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, त्या कारचालक मुलाची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास कलमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा बायपास येथे घडली होती. भौमिक अमोल लारोकार आणि पारडी येथील सागर संजय मेलवाणी (१७) अशी मृतांची नावे आहेत. मेहर असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाषनगर येथील १७ वर्षीय मुलगा मेहर हा मित्र भौमिक लारोकर (१८) तसेच सागर संजय मेलवाणी यांच्यासह अन्य मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारने जात होते. जय वेळवर न आल्यामुळे तिघांनी कार काढली आणि फेरटका मारण्यास निघाले. मेहरने कारने वेगाशी स्पर्धा करणे सुरु केले. काही वेळातच कारवरील नियंत्रण सुटल्याने उभ्या ट्रकवर कार आदळली. या अपघात तिघेही गंभीर जखमी झाले. भौमिक आणि सागरचा जागीच मृत्यू झाला तर मेहर हा जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या अपघातानंतर कळमना पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हाती कारची चावी देणाऱ्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या वडिलावर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाच्या हाती कार दिल्यामुळे दोन तरुणांचा बळी गेल्याने पोलिसांना कारवाईचा फास आवळला आहे.