देवळी,
rajesh-bakane : दैनंदिन धावपळ आणि विविध कामांमध्ये नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. परिणामी, आजाराचे निदान उशिरा होऊन उपचाराचा खर्चही वाढतो. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून आरोग्य अमृत महोत्सव शिबिर व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात येत आहे. यानिमित्ताने महायुती सरकारने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असल्याचे आ. राजेश बकाने म्हणाले.
स्थानिक विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इनडोअर क्रीडा स्टेडिअममध्ये येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून आमदार सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय गाते, तहसिलदार समर्थ क्षीरसागर, माजी उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, मुख्याधिकारी नेहा आकोडे, जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंग पवार, अधीक्षक आशिष लाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ. सुमित वानखेडे यांनी या शिबिरामध्ये येणार्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे सांगत उपचाराकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. नागपूरचे मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी यांनी सुद्धा आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.
शिबिरात सर्व प्रकारचे रोग निदान व उपचार, औषधी वाटप, चष्मे वाटप यांचे वेगवेगळे तपासणी कक्ष उभारण्यात आले होते. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ग्रामीण विभागातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामीण भागातील रुग्णांना शिबिरात आणण्याकरिता आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविकांनी प्रोत्साहित केले होते.
शिबिरात आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, अप्पर तहसिलदार स्नेहा क्षिरसागर यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांनी मानले.