बर्मिंगहॅम,
Cricket came to a halt as soon as solar eclipse क्रिकेटच्या मैदानावर सामना सुरू असताना अचानक आकाशात वेगळेच दृश्य पाहायला मिळाले आणि काही काळासाठी सर्वांचे लक्ष खेळापेक्षा सूर्यग्रहणाकडे वळले. ‘द हंड्रेड’ स्पर्धेतील बर्मिंगहॅम फिनिक्स आणि एमआय लंडन यांच्यातील सामन्यादरम्यान हे दुर्मिळ दृश्य दिसले. सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्टेडियममधील खेळाडू, अधिकारी आणि प्रेक्षकांनी विशेष चष्मे घातले आणि आकाशाकडे नजर वळवली.भारतीय वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी उशिरा हे सूर्यग्रहण झाले. भारतातून ते दिसले नाही, मात्र जगातील अनेक भागांमधून हे खगोलीय दृश्य पाहता आले. याच घटनेचा व्हिडिओ स्काय स्पोर्ट्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बर्मिंगहॅम फिनिक्स आणि एमआय लंडन यांच्यातील सामना सुरू असताना पहिल्या डावातील ६० चेंडू पूर्ण झाले होते. त्याचवेळी आकाशातील सूर्याचा आकार हळूहळू बदलताना दिसू लागला. काही वेळातच सूर्याचा काही भाग झाकला गेला आणि तो अर्धचंद्रासारखा भासू लागला. अचानक घडलेल्या या खगोलीय घटनेने मैदानावरील वातावरणच बदलून गेले.सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर सामन्यात काही काळासाठी व्यत्यय आला. स्टेडियममधील उपस्थितांनी सुरक्षिततेसाठी विशेष चष्म्यांचा वापर करत ग्रहणाचे निरीक्षण केले. सामना मात्र बराच वेळ थांबवण्यात आला नाही आणि काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. तरीही मैदानावरील आणि प्रेक्षकांमधील अनेकांचे लक्ष क्रिकेटपेक्षा आकाशातील या अद्भुत दृश्याकडेच अधिक राहिले.
दरम्यान, सामन्याचा निकालही चुरशीचा ठरला. एमआय लंडनने प्रथम फलंदाजी करत १५७ धावा उभारल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅम फिनिक्सला १०० चेंडूंच्या डावात ७ गडी गमावून १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे एमआय लंडनने हा सामना अवघ्या २ धावांनी जिंकला. सामन्यातील दोन धावांचा विजय जितका चर्चेत राहिला, त्यापेक्षा सामन्यादरम्यान दिसलेल्या सूर्यग्रहणाने उपस्थितांचे लक्ष अधिक वेधून घेतले. क्रिकेट आणि खगोलीय घटना एकाच वेळी अनुभवण्याचा हा क्षण प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरला.