पोलिस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांना केंद्रीय दक्षता पदक प्रदान

- नागपुरातील बाळ विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - शहरातील टोळीवर राज्यातील पहिला मकोका

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
rekha sankpal awarded  केंद्रशासीत प्रदेश, सर्व राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट तपास यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार देण्यात येतो. नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक रेखा सागर संकपाळ यांना या वर्षीचे सर्वोत्कृष्ट तपासासाठी हे पदक जाहीर झाले. त्यांनी बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मकोका गुन्हा दाखल केला होता. बाळविक्री प्रकरणी एएचटीयू पोलिसांनी तब्बल १० टोळ्यांचा उलगडा करीत ९१ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता, हे विशेष.
 

rekha sankpal awarded  
 
 
प्रत्येक राज्यातील पोलिस आणि अन्य तपास यंत्रणांकडून सर्वोत्कृष्ट तपास आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात येते. प्रत्येक राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी असते. केंद्रीय दक्षता पदक पुरस्कारासाठी देशभरातून हजारो पोलिस अधिकाऱ्यांची नामांकने येतात. त्यामधून सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय दक्षता पदक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सीआयडी विभागात पोलिस उपाधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या रेखा सागर संकपाळ यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून पुण्यात आयोजित कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य पोलिस दलाचे प्रमुख पोलिस महासंचालक सदानंद दाते, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त सुहास वारके आदि अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलिस दलातील तब्बल ३० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षता पदके मिळाली आहेत. त्यामध्ये पोलिस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांचा समावेश आहे.
राज्यातील पहिला मकोका
राज्यात बाळ विक्री करणाऱ्या टोळ्यांचे मुख्य केंद्र म्हणून नागपूर शहराची ओळख निर्माण झाली होती. बाळविक्री करणाऱ्या टोळ्या नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या (एएचटीयू) पोलिस अधिकारी रेखा संकपाळ यांनी तब्बल १० टोळ्यांचा उलगडा केला.rekha sankpal awarded बाळ विक्री करणाऱ्या ९१ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिस रेखा संकपाळ यांनी राज्यातील पहिला मकोका गुन्हा दाखल केला, हे विशेष. याच तपासासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे केंद्रीय दक्षता पदक पुरस्कार मिळाला आहे.