वाशीम,
aadhaar authentication process पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील २६ हजार ३३३ पात्र शेतकर्यांच्या खात्यात एकूण २२४ कोटी ८६ लाख रुपयांची लाभाची रक्कम जमा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात योजनेच्या लाभाची रक्कम वर्ग करण्यात आली.

राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. वाशीम जिल्ह्यातील ६९४ गावामधील सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील एकूण ५४ हजार १०२ पात्र लाभार्थी शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी ४३ हजार ६०८ शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यापैकी २६ हजार ३३३ पात्र लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात २२४ कोटी ८६ लाख रुपये जमा झाले आहेत. यामध्ये सेवा सहकारी संस्थांचे म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ हजार ११४ सभासद असून, त्यांच्या खात्यात १४३ कोटी ८० लाख रुपये जमा झाले आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे ८ हजार २१९ सभासद असून, त्यांच्या खात्यात ८१ कोटी ६ लाख रुपयांचा लाभ जमा झाला आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांची अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या पात्र लाभार्थी शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे, त्यांनी विलंब न करता आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशीम एम. एस. लटपटे यांनी केले आहे.